World Cup 2023 IND vs PAK : पाकिस्तानचा सध्याचा आघाडीचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या बेरंग दिसत आहे. त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उडवली जात आहे. अशातच भारताचे समालोचक रवि शास्त्री यांनीही त्याच्यावर ताशोरे ओढले आहेत. शाहीन आफ्रिदी सरासरी गोलंदाज आहे. त्याची तुलना वसीम अक्रमशी करायला नको, असे म्हणत रवि शास्त्री यांनी शाहीनवर टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना रवि शास्त्री यांनी शाहीनच्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या. 


शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. हायव्होल्जेट सामना रंगतदार होईल, त्यामुळे लाखभर चाहते नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आले होते. पण पाकिस्तानच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली. आधी फलंदाजांनी हराकिरी केली, मग गोलंदाजांनी प्रभावहीन मारा केला. यामध्ये त्यांचा गन गोलंदाज शाहीनचाही समावेश होता. शाहीन आफ्रिदीला भारताच्या फलंदाजांनी चोप चोपले. त्याला फक्त दोन विकेट घेता आल्या. शिवाय धावाही रोखता आल्या नाही. शाहीनच्या गोलंदाजीबाबत रवि शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली. शाहीन म्हणजे वसीम अक्रम नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल अतिशयोक्ती करण्याची गरज नाही, असे म्हणत रवि शास्त्री यांनी शाहीनच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. यावेळी शास्त्री यांनी नसीम शाह यांचाही उल्लेख केला आहे.


काय म्हणाले रवि शास्त्री ?
रवि शास्त्री म्हणाले की, नसीम शाह चांगला गोलंदाज आहे. तो नवीन चेंडूने विकेटही घेतो. पण नसीम शाह खेळत नाही. त्यातच पाकिस्तानची फिरकी गोलंदाजी कमकूवत आहे. शाहीन आफ्रिदी हा वसीम अक्रम नाही. तो चांगला गोलंदाज आहे. पण तेवढी अतिशयोक्ती करण्याची गरज नाही.


जेव्हा ठीक ठाक आहे, तेव्हा ठीक ठाकच म्हणायला हवं. अतिशयोक्तीची गरज नाही. शाहीन म्हणजे वसीम अक्रम नाही, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. कोणी चांगला खेळाडू असेल तर त्याला चांगलाच म्हटले पाहिजे. महान बनवू नये, असे रवि शास्त्री म्हणाले. 


शाहीनची कामगिरी कशी ?


भारताविरोधात शाहीन आफ्रिदीला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना त्याने बाद केले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. शाहीन अफ्रिदीने सहा षटकात 36 धावा खर्च करत दोन फलंदाजांना बाद केले. नेदरलँडविरोधातही 37 धावा खर्च केल्या होत्या, फक्त एक विकेट घेता आली नाही. लंकेविरोधात 66 धावा खर्च करत एक विकेट घेतली होती. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात शाहीनला अपेक्षानुसार कामगिरी करता आली नाही. शाहीनला फक्त चार विकेट घेता आल्या आहेत. 


शाहीनचं वनडे करिअर शानदार राहिलेय. त्याने फक्त 47 वनडे सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत. तर 27 टेस् सामन्यात  105 विकेट घेतल्या आहेत. शाहीन अफ्रिदीची वनडेमधील सर्वोच्च कामगिरी 35 धावा खर्च करत सहा विकेट आहे.