Most wickets in WTC : भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान अश्विनला मिळाला आहे. अश्विनने दोन हंगामात 100 विकेट घेतल्या आहेत.
श्रीलंकाविरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यात अश्विनने 12 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. कसोटीत अश्विनच्या नावावर 442 विकेटची नोंद आहे. हा कारनामा करतानाच अश्विनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 100 विकेटही पूर्ण केल्या आहेत. असा पराक्रम करणारा अश्विन जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. कमिन्सच्या नावावर 93 विकेट आहेत. त्यानंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉडचा क्रमांक लागतो. ब्रॉडने 83 विकेट घेतल्या आहे. या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे. बुमराहने 74 विकेट घेतल्या आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज -
100- आर अश्विन
93- पॅट कमिन्स
83- स्टुअर्ट ब्रॉड
80- टिम साउदी
74- जसप्रीत बुमराह
74- नाथन लायन
कपिल देव यांच्यानंतर डेल स्टेनलाही टाकलं मागं -
अश्विननं दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला (Dale Steyn) मागं टाकलं. धनंजय डिसिल्व्हाच्या रुपात अश्विनने आपल्या कारकिर्दीतील 440वी कसोटी विकेट घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनच्या नावावर 439 विकेट्स नोंद आहे. यासह कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत अश्विन आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. डेल स्टेननं दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना कसोटी क्रिकेटमधील 93 सामन्यात 439 विकेट्स घेतल्या आहेत. तर, आर. अश्विननं त्याच्या कारकिर्दीतील 86 व्या सामन्यातच 440 विकेट घेऊन मोठा पराक्रम केलाय. याआधी अश्विननं भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला होता. कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 434 विकेट्स घेतल्या आहेत.