Mumbai vs Uttarakhand, 2nd Quarter-Final: रणजी ट्राफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्य पूर्व सामन्यात बलाढ्य मुंबईने उत्तराखंडचा तब्बल 725 धावांनी पराभव केलाय. यासह मुंबईने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. आतापर्यंत कोणत्याही संघाला इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकता आलेला नाही. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहेच, शिवाय जगातील सर्व प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा विराट विजय आहे. 1929-30 मध्ये न्यू साउथ वेल्सने क्वीन्सलँडवर तब्बल 685 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. आता 93 वर्षानंतर मुंबईने हा विक्रम मोडीत काढलाय. रणजी चषकात सर्वाधिक धावांने विजय मिळवण्याचा विक्रम पश्चिम बंगालच्या नावावर होता. पश्चिम बंगालने 1953-54 मध्ये ओडिशाचा 540 धावांनी पराभव केला होता. हा विक्रमही मुंबईने मोडलाय.  


पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईने या विशाल विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. आता 14 जून रोजी उपांत्य फेरीत मुंबईचा सामना उत्तर प्रदेश संघासोबत होणार आहे. उपांत्य पूर्व सामन्यात मुंबईच्या संघाने पहिल्या चेंडूपासूनच उत्तराखंडवर वर्चस्व ठेवलं होतं. 


पहिल्या डावात मुंबईची 533 धावांची आघाडी -
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या सुवेद पारकरने द्विशतकी खेळी केली. पारकरने 252 धावांची खेळी केली तर सरफराज खानच्या 153 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात आठ गड्यांच्या मोबदल्यात 647 धावांचा डोंगर उभारला.  शम्स मुलानीनेही शानदार प्रदर्शन करत 59 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरदाखल  उत्तराखंडचा डाव फक्त 114 धावांत संपुष्टात आला. मुंबईकडून शम्स मुलानीने धारधार गोलंदाजी तर पाच विकेट घेतल्या..  पहिल्या डावात मुंबईने तब्बल 533 धावांची आघाडी घेतली होती.  


दुसऱ्या डावात यशस्वीचा झंझावात -
533 धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईने फॉलोअन न देता फलंदाजी केली. यशस्वी जायस्वालचं वादळी शतक (130) आणि कर्णधार पृथ्वी शॉ (72) आणि आदित्य तारे (57) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने तीन गड्यांच्या मोबदल्यात 261 धावांवर डाव घोषीत केला. त्यामुळे मुंबईच्या संघाकडे 794 धावांची विशाल आघाडी झाली होती. उत्तराखंडला विजयासाठी 795 धावांचे विराट आव्हान देण्यात आले होते. प्रत्युत्तरदाखल उत्तराखंडचा संघाला 100 धावांचा पल्लाही पार करता आला नाही. उत्तराखंडचा संघ 69 धावांत संपुष्टात आला. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलानी यांच्या भेदक गोलंदाजीपुढे उत्तराखंडचा डाव 69 धावांत संपुष्टात आला. मुंबईने हा सामना तब्बल 725 धावांनी जिंकत विश्वविक्रम केला.