Jaydev unadkat in Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफी 2022-2023 चा अंतिम सामना (Ranji Trophy Final) आज 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यावेळी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बंगाल आणि सौराष्ट्रचे (Bengal vs Saurashtra) संघ आमनेसामने आहेत. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने नवा विक्रम केला. जयदेव हा रणजी ट्रॉफीमध्ये आपला संघ सौराष्ट्रसाठी 300 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे.


जयदेव ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होता, परंतु त्याला रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. यावेळी त्याचा संघ सौराष्ट्र अंतिम फेरीत पोहोचला असून, कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर त्यांचा सामना बंगाल संघाशी होत आहे. 


फायनलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जयदेवनं घेतली विकेट


या सामन्यात जयदेव सौराष्ट्रचं नेतृत्व करत असून त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयदेवने स्वतःच्या पहिल्याच षटकातच विकेट घेत आपला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. त्यानंतर अवघ्या 2 धावांवर बंगालच्या 3 फलंदाजांना सौराष्ट्र संघानं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. त्यानंतर बंगालचा संपूर्ण संघ अवघ्या 174 धावांत ऑलआऊट झाला. या डावात जयदेवने 13.1 षटकात 44 धावांत 3 बळी घेतले आणि यासह तो 300 बळी घेणारा सौराष्ट्रासाठी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला. डाव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने 2010 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. ज्यानंतर कारकिर्दीच्या 77 व्या सामन्यात बंगालच्या मुकेश कुमारला बाद करून हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.


एका हंगामात सर्वाधिक विकेट्स


जयदेवने यंदाच्या हंगामात सौराष्ट्रकडून 7 डावात एकूण 20 बळी घेतले आहेत. कोणत्याही एका रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही जयदेवच्या नावावर आहे. 2019-20 च्या मोसमात त्याने 67 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय हंगामाच्या सुरुवातीला जयदेवने दिल्लीविरुद्ध पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेण्याचा विक्रमही केला होता. रणजी ट्रॉफीच्या त्या सामन्यात जयदेवने 39 धावांत 8 विकेट्स घेतले, ही प्रथम श्रेणी गोलंदाजीची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.


भारतीय संघातून केलं रिलीज


बॉर्डर गावस्कर मालिकेतील दुसरा कसोटी सामना नवी दिल्लीच्या स्टेडिअमवर होणार आहे. 17 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या सामन्यापूर्वीच बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला रिलीज केलं. नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीचाही उनाडकट भाग नव्हता. जयदेव सौराष्ट्राकडून रणजी चषकाचा फायनल सामना खेळणार असून तो कर्णधार असल्याने बीसीसीआयने त्याला रिलीज केलं. 


हे देखील वाचा-