Mumbai vs Vidarbha, Ranji Trophy Final 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईनं रणजी चषकाच्या अंतिम सामन्यावर पकड मजबूत केली आहे. मुंबईनं दुसऱ्या दिवसाअखेर 260 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे 58 आणि मुशीर खान 51 धावांवर खेळत आहेत. मुंबईचा पहिला डाव 224 धावांत आटोपला. विदर्भाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती, पण मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे दाणादाण उडाली. विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 105 धावांत संपुष्टात आला. रणजी चषकाच्या अंतिम सामन्यावर मुंबईनं पकड मजबूत केली आहे. 


वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ यांच्यामध्ये रणजी चषकाच्या फायनलचा थरार सुरु आहे. जेतेपदाच्या सामन्यात विदर्भाची अवस्था बिकट झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने दुसऱ्या डावात दोन बाद 141 धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईकडे 260 धावांची आघाडी झाली होती. अजिंक्य रहाणे आणि मुशीर हे लयीत दिसत होते. दोघांनीही संयमी अर्धशतकं ठोकली. अजिंक्य रहाण 109 चेंडूत 58 धावांवर खेळत आहे. तर मुशीर खान 135 चेंडूत 51 धावांवर नाबाद आहे. 


42 व्या जेतेपदाकडे मुंबईची वाटचाल - 


रणजी चषकाच्या फायनलवर मुंबईने वर्चस्व मिळावलं आहे. रणजी चषकाच्या इतिहासात मुंबई 48 वा फायनल सामना खेळत आहे. मुंबईने आतापर्यंत 41 वेळा रणजी चषकावर नाव कोरलं आहे. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने  42 व्या जेतेपदाकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे विदर्भाला फक्त दोन वेळा रणजी चषकावर नाव कोरता आलेय. 


शार्दूलची भन्नाट फटकेबाजी - 


जेतेपदच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डवत फक्त 224 धावांवर समाधान मानावे लागले. विदर्भाच्या माऱ्यापुढे मुंबईची अवस्था अतिशय खराब झाली होती. मुंबईची अवस्था एकवेळ 6 बाद 111 अशी दैयनीय झाली होती. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हे दिग्गज स्वस्तात तंबूत परतले होते. पण त्याचवेळी शार्दूल ठाकूर संकटकाळात धावून आला. शार्दूल ठाकूर यानं झंझावती 75 धावांची खेळी केली. शार्दूलच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला.  विदर्भाचा डाव अवघ्या 105 धावांत संपुष्टात आला.  विदर्भाच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. शम्स मुलानी, तनुश कोटियन आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. 


अजिंक्यने डाव सावरला - 


विदर्भाला 105 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईल 119 धावांची आघाडी मिळाली. पण दुसऱ्या डावात मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवानी स्वस्तात माघारी परतले. विदर्भाचा संघ सामन्यात कमबॅक करेल असेच सर्वांना वाटत होते. पण कर्णधार अजिंक्य रहाणे यानं मुशीरला हाताशी धरत खडूस फलंदाजी केली. दोघांनी नाबाद 107 धावांची भागिदारी केली.  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे 58 आणि मुशीर 51 धावांवर नाबाद होते.