बारबाडोस : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात बारबाडोसमध्ये सुपर 8 चा सामना होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमनं ग्रुप स्टेजमध्ये सर्व मॅच जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता. भारत आणि कॅनडा मॅच पावसामुळं रद्द करण्यात आली होती. भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅचकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सुपर 8 मध्ये भारताच्या तीन मॅच होणार आहेत. यापैकी दोन मॅच जिंकल्यातरी भारतीय संघ उपांत्य फेरीच्या लढतीत पोहोचणार आहे. यामुळं भारताला आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया सज्ज झाली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी सुपर 8 मधील पहिल्या मॅचपूर्वी रोहित शर्मासह सर्व खेळाडूंना इशारा दिला आहे. अफगाणिस्तान या फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक संघ आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, असंही  द्रविड यांनी संघातील खेळाडूंना सांगितलं. 


राहुल द्रविड नेमकं काय म्हणाले?


अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचपूर्वी राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाले की आपल्या सर्वांना माहिती आहे अफगाणिस्तान या फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक टीम आहे. अफगाणिस्ताननं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. अफगाणिस्तानला इतर फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा फारसा अनुभव नसेल. मात्र, त्यांच्या खेळाडूंनी अनेक टी20 लीगमध्ये बरेच क्रिकेट खेळलं आहे. त्यांच्या तुलनेत आपल्या काही खेळाडूंकडे तसा अनुभव कमी आहे, असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.  


टी 20 क्रिकेटमध्ये आपण त्यांच्या टीमला हलक्यात घेण्यासारखी परिस्थिती नाही. त्यांनी चांगली कामगिरी करत सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं असून ते त्याचे दावेदार आहेत, असंही राहुल द्रविड म्हणाले. 


अफगाणिस्तानला ग्रुप स्टेजमधील अखेरच्या लढतीत वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यांनी त्यापूर्वी ग्रुप स्टेमधील मॅचेसमध्ये न्यूझीलंड सारख्या तगड्या संघाला पराभूत केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध राशिद खाननं 4  विकेट घेतल्या होत्या. त्याच मॅचमध्ये फजलहक फारुकीनं देखील 4 विकेट घेतल्या होत्या. अफगाणिस्तानकडे आक्रमक गोलंदाज आहेत, त्यांच्याकडील वेगवान गोलंदाजांना देखील अनुभव आहे. फारुकी आणि नवीन-उल-हक यांना देखील चांगला अनुभव आहे. या दोघांनी बरंच क्रिकेट खेळलं असून ते दोघेही बॉल चांगला स्विंग करु शकतात, असं राहुल द्रविड म्हणाले. 


अफगाणिस्तान विरुद्ध खेळणं आव्हान असलं तरी आम्ही चांगली कामगिरी, असा विश्वास देखील राहुल द्रविड यांनी व्यक्त केला.


संबंधित बातम्या :



RSA vs USA:  दक्षिण आफ्रिकेची सुपर 8 मध्ये विजयी सलामी, नवख्या अमेरिकेनं झुंजावलं