Ranji Trophy 2022-23: गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असणाऱ्या पृथ्वी शॉने रणजी सामन्यात धुवांधार फलंदाजी केली आहे. पृथ्वीनं 28 चौकाराच्या मदतीनं द्वशतकी खेळी केली आहे. पृथ्वी शॉच्या तुफानी फलंदाजीपुढे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज दुबळे जाणवत होते. द्विशतकी खेळी करत पृथ्वी शॉने भारतीय निवड समितीचं लक्ष वेधलेय.
मुंबई आणि आसाम यांच्यात रणजी क्रिकेट स्पर्धेत सामना सुरु आहे. या सामन्यात पृथ्वी शॉने आसामच्या गोलंदाजांची पिसे काढली. पृथ्वी शॉने 235 चेंडूचा सामना करताना द्विशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान पृथ्वीने 28 चौकार आणि एक षटकार लगावला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पृथ्वी शर्मा 240 धावांवर नाबाद होता.
पृथ्वी शॉने मुशीर खानसोबत 123 धावांची सलामी दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 200 नाबाद 200 धावांची भागिदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईच्या दोन बाद 397 धावा झाल्या होत्या. पृथ्वी शॉने फिरकिपटू रोशन आलम याची गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. रोशन आलम याच्या 76 चेंडूवर 76 धावा वसूल केल्या. यंदाच्या रणजी हंगामातील पृथ्वीचं पहिलेच शतक होय. रणजी स्पर्धेतील पृथ्वीचा हा सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. मागील सात डावात पृथ्वीच्या फक्त 160 धावा होत्या, पण आज झालेल्या सामन्यात पृथ्वीनं दमदार फलंदाजी केली.
पृथ्वी शॉ सध्या भारतीय संघाबाहेर आहे. पृथ्वीने टीम इंडियासाठी अखेरचा सामना जुलै 2021 मध्ये खेळला आहे. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वीनं खोऱ्यानं धावा ओढल्या आहेत. पण त्याला अद्याप संघात निवडलं जात नाही. सयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वीने नऊ डावात 181.42 च्या स्ट्राइक रेटने 332 धावा चोपल्या होत्या. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाज पृथ्वी दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याशिवाय विजय हजारे चषकातही पृथ्वीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता. विजय हजारे चषकात पृथ्वीने सात डावात 217 धावांचा पाऊस पाडला होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये पृथ्वीची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा ओढणाऱ्या पृथ्वीची भारतीय संघात कधी निवड होतोय, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय.
हे देखील वाचा-