IND vs SL, 1st ODI : गुवाहाटी येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये (IND vs SL ODI) भारताने श्रीलंकेला 67 धावांनी मात देत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी फलंदाजी करत भारताने 374 धावांचे लक्ष्य श्रीलंका संघासमोर ठेवले. पण 50 षटकांत श्रीलंकेचा संघ 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला ज्यामुळे भारत 67 धावांनी विजयी झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी श्रीलंकन कर्णधार दासून शनाकाने नाबाद 108 धावा ठोकत एक कडवी झुंज दिली, पण संघाला विजयी करण्यासाठी ही पुरशी नसल्याने अखेर श्रीलंका संघ पराभूत झाला आहे.






सामन्यात सर्वप्रथम श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताने चांगली सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्माने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार म. मारत 67 चेंडूत 83 धावा केल्या. तर शुभमन गिलने 60 चेंडूत 70 धावांचे योगदान दिले. गिलने आपल्या खेळीत 11 चौकार लगावले. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने 29 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण यासर्वांपेक्षा सर्वाधिक धावा करत दमदार असं शतक लगावलं किंग कोहलीने. विराटने 12 चौकार आणि 1 षटकार ठोकत 113 धावा केल्या. मात्र, याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्यासारख्या फलंदाजांनी निराशा केली. श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 28 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 14 धावा केल्या.


ज्यानंतर 394 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाचे बरेच फलंदाज अपयशी झाले. पाथुम निसांकाचे 72 तर धनंजया डिसिल्वाच्या 47 धावांनी संघाला तारलं. पण यासर्वाशिवाय अखेरपर्यंत झुंज दिली ती कर्णधार दासून शनाका याने. दासूनने 12 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 108 धावा केल्या, पण अखेर षटकं कमी पडल्याने श्रीलंकेचा संघ 50 षटकात 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला ज्यामुळे भारत 67 धावांनी विजयी झाला आहे. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 तर सिराजने 2 चहल, पांड्या आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.


हे देखील वाचा-