मुंबई : आशिया चषकातील यंदाचा भारत विरुद्ध पाकिस्तान (IndvsPak) यांच्यातील सामना चांगलाच वादग्रस्त ठरला. सामना सुरू होण्याअगोदरपासून वादात असलेला हा सामना भारताने (Team india) विजय मिळवल्यानंतरही वादग्रस्त ठरला आहे. टीम इंडियाने 15.5 षटकांत लक्ष्य गाठत पाकिस्तानचा दारुण पराभव केला. कर्णधार सूर्यकुमार यादवने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर, सर्वत्र जल्लोष सुरू झाला, पण सामना जिंकल्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे विरोधी संघातील सदस्यांशी हस्तांदोलन न करताच भारतीय फलंदाज मैदानातून बाहेर आल्याने वादंग उठलं आहे. आता, पीसीबी (PCB) म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट आयसीसीकडे तक्रार केली असून भारत-पाकिस्तान यांच्या सामन्यातील मॅच रेफरीची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नो शेकहँड वादावरुन एसीसी आणि आयसीसीकडे भारतीय संघाची तक्रार केली आहे, पीसीबीने थेट सामन्याचे पंच अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर निशाणा साधत त्यांना आशिया चषकातून हाकलून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अँडी पायक्रॉफ्ट यांची आशिया कपमधील मॅच रेफरी पॅनल लिस्टमधून हकालपट्टी करावी, अन्यथा आशिया चषक स्पर्धेतून पाकिस्तान आपलं नाव मागे घेईल, असा इशाराही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिला आहे. पायक्रॉफ्ट यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत, टॉस फडकवत असताना भारत आणि पाकिस्तान संघाच्या दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरुन, पीसीने नाराजी व्यक्त करत पंचांवर कारवाई मागणी केली आहे. तसेच, कारवाई न केल्यास पुढील सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिल्याचे वृत्त क्रिकबझने दिले आहे.
आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत भारतीयांची मने जिंकली. पण, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र, सरकारने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला होता. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. क्रिकेट विश्वातूनही तशा प्रतिक्रिया आल्या होता. मात्र, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झालाच. सामना जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
आम्ही त्यांना योग्य उत्तर दिलं
टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये सूर्यकुमार यादवने पाकच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं, याचं कारण सांगितलं आहे. आमचे सरकार आणि बीसीसीआय, आम्ही एकत्र होतो. आम्ही एकत्र इथे आलो, आम्ही एक निर्णय घेतला आणि मला असे वाटते की, आम्ही फक्त खेळ खेळण्यासाठी इथे आलो आहोत. आम्ही त्यांना (पाकिस्तानला) योग्य उत्तर दिले. आयुष्यात खेळाडूंच्या भावनेपुढे फार कमी गोष्टी असतात, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
हेही वाचा
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत