Pakistan Players Omitted From ICC Ticket Promotions : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आगामी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2026) तिकीट विक्रीसाठी आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या पोस्टरवर नाराज आहे. कारण या पोस्टरमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाचा (Salman Ali Agha) फोटोच नाही. विशेष म्हणजे सलमान आगाचा फोटो पोस्टवरून गायब राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी आशिया कप 2025 दरम्यानही असाच प्रकार घडला होता.
पोस्टरवर फक्त पाच खेळाडूंचे फोटो...
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, पीसीबीच्या एका विश्वासार्ह सूत्राने सांगितले की हा मुद्दा थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपुढे (ICC) मांडण्यात आला आहे. कारण तिकीट विक्रीसाठीच्या पोस्टरवर केवळ पाच देशांच्या कर्णधाराचे फोटो वापरण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये भारताचा सूर्यकुमार यादव, दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम, ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श, श्रीलंकेचा दासुन शनाका आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांचा समावेश आहे.
सूत्राने सांगितले, “काही महिन्यांपूर्वी आशिया कपच्या वेळीही आम्हाला अशाच समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी प्रसारकांनी आमच्या कर्णधाराचा फोटो न वापरताच प्रचार मोहीम सुरू केली होती.” पीसीबीने आशियाई क्रिकेट परिषद (ACC)शी चर्चा केल्यानंतरच त्या वेळी परिस्थितीत बदल झाला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळीही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याची खंत पीसीबीने व्यक्त केली आहे. सूत्राने पुढे सांगितले, “जरी पाकिस्तान आयसीसी टी-20 क्रमवारीत सध्या अव्वल पाच संघांमध्ये नसला, तरी आमचा क्रिकेटमधील इतिहास समृद्ध आहे. विश्वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तान हा नेहमीच लक्ष वेधून घेणारा संघ राहिला आहे.” पीसीबीला पूर्ण विश्वास आहे की आयसीसी लवकरच आपल्या पोस्टर आणि मोहिमांमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराचा समावेश करेल आणि हा वाद मिटवला जाईल.
हे ही वाचा -