Hardik Pandya-Gautam Gambhir Dressing-Room Video : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत चुरस वाढत चालली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 51 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली असून, भारतीय संघाच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः गोलंदाज आणि फलंदाज दोघेही सपशेल अपयशी ठरल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
हार्दिक पांड्या अन् गौतम गंभीरचा व्हिडीओ व्हायरल
या पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार खेळाडू हार्दिक पांड्या यांच्यात गंभीर चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. काही चाहत्यांनी या व्हिडीओवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचा दावा केला आहे. मात्र, व्हिडीओमध्ये ऑडिओ नसल्याने ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यावर होती, हे स्पष्ट होत नाही.
फलंदाजी क्रमात बदल ठरला महाग
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तर टीम इंडिया अवघ्या 162 धावांवर गारद झाली. सलग अपयशाचा सामना करत असलेला शुभमन गिल शून्यावर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर पाठवलेल्या अक्षर पटेलने 21 चेंडूत केवळ 21 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवही फक्त 5 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने 23 चेंडूत 20 धावा केल्या, पण तोही अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.
तिलक वर्माने 62 धावांची झुंजार खेळी करत आशा निर्माण केली, मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातातून निसटला होता. धक्कादायक बाब म्हणजे, या सामन्यात काही मोजकेच फलंदाज आपल्या नेहमीच्या क्रमांकावर खेळले, तर इतरांना नवे रोल देण्यात आले. हाच प्रयोग टीम इंडियाला महागात पडल्याचं स्पष्ट झालं.
धर्मशाळेत तिसरा सामना
मालिकेतील तिसरा टी-20 सामना 14 डिसेंबर रोजी धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, जो संघ जिंकेल त्याला मालिकेत आघाडी घेण्याची संधी मिळेल. पराभवातून सावरण्यासाठी आणि दमदार पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया या सामन्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.
हे ही वाचा -