Team India playing XI vs Pak U19 Men’s U19 Asia Cup 2025 : अंडर-19 आशिया चषक 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रविवार 14 डिसेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून दोन्ही संघ विजयाची लय कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ग्रुप ‘अ’ मध्ये असून दोघांनीही आपले पहिले लीग सामने जिंकले आहेत. प्रत्येकी 2-2 गुण असले तरी उत्तम रनरेटमुळे पाकिस्तान सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने पहिल्या सामन्यात यूएईचा तब्बल 234 धावांनी पराभव केला होता, मात्र पाकिस्तानने मलेशियाविरुद्ध त्याहूनही मोठा विजय मिळवत 297 धावांनी सामना जिंकला होता.
प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाची शक्यता कमी
भारत-पाकिस्तान सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून दोन्ही संघ दुबईत आमनेसामने येणार आहेत. भारत विरुद्ध यूएई सामन्यात खेळलेली खेळपट्टी अत्यंत सपाट होती आणि फलंदाजांना मोठी मदत मिळत होती. भारत-पाकिस्तान सामना त्याच खेळपट्टीवर होणार की वेगळ्या पिचवर, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र आतापर्यंत दुबईत झालेल्या सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला आहे.
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. संघ आपल्या विनिंग कॉम्बिनेशनसहच मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. भारतासाठी सलामीला वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे डावाची सुरुवात करतील. वैभव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून पाकिस्तानविरुद्धही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. यूएईविरुद्ध अन्य भारतीय फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली होती.
भारताची संभाव्य फलंदाजी अन् गोलंदाजी
भारतीय फलंदाजी क्रमात वैभव आणि आयुषनंतर आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आणि कनिष्क चौहानचा समावेश असेल. तर गोलंदाजीची जबाबदारी खिलान पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क सिंग यांच्या खांद्यावर असेल.
दुसरीकडे पाकिस्तानचा संघही तितकाच मजबूत दिसत असून भारत-पाकिस्तान यांच्यात हा सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे. चाहत्यांना एका हाय-व्होल्टेज क्रिकेट थराराची नक्कीच अपेक्षा ठेवता येईल.
पाकिस्तान विरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11 : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, कनिष्क चौहान.
भारताविरुद्ध पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग-11 : उस्मान खान, समीर मिन्हास, अली हसन बलोच, फरहान युसूफ (कर्णधार), अहमद हुसैन, हमजा जहूर (यष्टीरक्षक), हुजैफा अहसान, नकाब शफीक, दानियाल अली खान, मोहम्मद सय्यम, अली रझा.
हे ही वाचा -