Pat Cummins on Border-Gavaskar Trophy : भारतीय क्रिकेट संघाला या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका खेळली जाणार आहे. केवळ चाहतेच नाही तर क्रिकेटपटूही भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एक वक्तव्य केले आहे.


काय म्हणाला पॅट कमिन्स?


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी गेली काही वर्षे स्वप्नासारखीच आहेत. कर्णधार झाल्यापासून त्याने ऑस्ट्रेलियासाठी 2 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. सगळ्यात आधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आणि नंतर एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये विजेतेपद जिंकले. पण, आतापर्यंत पॅट कमिन्सला बॉर्डर-गावसकर मालिका जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत आता कमिन्सला टीम इंडियाला हरवून ही ट्रॉफी जिंकायची आहे.


पॅट कमिन्स म्हणाला की, "मी आणि माझ्या संघातील अनेक खेळाडूंनी यापूर्वी कधीही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली नाही. कसोटी संघ म्हणून आम्ही गेल्या काही वर्षांत काही आश्चर्यकारक गोष्टी साध्य केल्या आहेत. घरच्या मैदानावर प्रत्येक मालिका जिंकण्यासाठी आमचा स्वत:वर विश्वास आहे. तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि या उन्हाळ्यात आमच्यासाठी हेच लक्ष्य आहे. मला वाटते की आम्ही मजबूत स्थितीत आहोत."






भारताने 2017 पासून शेवटची 4 बॉर्डर-गावसकर मालिका घरच्या मैदानावर दोनदा जिंकली आहे, याशिवाय 2018-19 आणि 2021-22 मध्ये दोन ऐतिहासिक मालिका जिंकल्या आहेत.


WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ही मालिका महत्त्वाची... 


जर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर टीम इंडिया सध्या नंबर-1 आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला अजून 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. सर्वप्रथम, 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचे यजमानपद भूषवायचे आहे आणि मग या नोव्हेंबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जायचे आहे.


बॉर्डर-गावसकर मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक -


पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस/रात्र)
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी


संबंधित बातमी :


WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला खेळावा लागणार मोठा गेम; जाणून घ्या काय आहे नेमकं गणित


दक्षिण अफ्रिकेने मालिका जिंकली; WTCच्या क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकलं, टीम इंडिया कितव्या स्थानावर?


विकेटकीपिंग सोडली अन् थेट गोलंदाजीसाठी आला; ऋषभ पंतने पहिला चेंडू टाकताच खेळ खल्लास, video