Pakistan Cricket Team Player : वन डे विश्वचषक स्पर्धेपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डापुढे मोठे संकट उभे राहिले आहे.  रिपोर्ट्सनुसार, मागील चार महिन्यापासून पाकिस्तान संघातील खेळाडूंना पगारच मिळाला नाही. पगार न दिल्यामुळे संघातील खेळाडू वर्ल्डकप प्रमोशन आणि प्रायोजकत्व लोगोवर बहिष्कार घालण्याची धमकी देत ​​आहेत. त्यामुळे विश्वचषकापूर्वी PCB समोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.


‘क्रिकेट पाकिस्तान’च्या एका रिपोर्ट्सनुसार, मागील चार महिन्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंना वेतन अथवा सामन्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे खेळाडू नाराज झाले आहेत. यापूर्वीच्या रिपोर्ट्समध्ये, पाकिस्तानी खेळाडूंच्या पगारात मोठी वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु नवीन करारावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही.


पाकिस्तान संघातील एका खेळाडूने नाव न सांगण्याच्या अटीवर 'क्रिकेट पाकिस्तान'ला माहिती दिली. तो म्हणाला की, “आम्ही पाकिस्तानचे मोफत प्रतिनिधित्व करण्यास तयार आहोत, परंतु बोर्डाशी संबंधित असलेल्या प्रायोजकांना प्रोत्साहन का द्यावे हा प्रश्न आहे.  विश्वचषकादरम्यान, आम्ही आयसीसीच्या व्यावसायिक जाहिरातींशी संबंधित राहणार नाही." 


रिपोर्ट्समध्ये म्हटलेय की, खेळाडू आयसीसी आणि स्पॉन्सरकडून मिळणाऱ्या उत्पन्नातील वाटा मागत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसी आणि स्पॉन्सरकडून सुमारे 9.8 अब्ज रुपये मिळणार आहेत.


वर्ल्ड कपमध्ये 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा पहिला सामना


बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ विश्वचषकाची सुरुवात सहा ऑक्टोबरपासून करणार आहे. पाकिस्तानचा पहिला सामना नेदर्लंडविरोधात होणार आहे. त्यानंतर दहा ऑक्टोबला श्रीलंका तर १४ ऑक्टोबर रोजी भारताविरोधात दोन हात करणार आहे. 


नसीम शाह आऊट, हसन अली याला संधी 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी १५ शिलेदारांची घोषणा केली आहे. २२ सप्टेंबर रोजी पीसीबीने ट्वीट करत खेळाडूंची नावे जाहीर केली. दुखापतीमुळे नसीम शाह याला विश्वचषकात खेळता येणार नाही. त्याच्याजाही असन अली याला संधी देण्यात आली आहे. नसीम शाह याला आशिया चषकात दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेलाय.  शादाब खान, मोहम्मद नवाज आणि उसामा मीर या तीन फिरकी गोलंदाजांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.


वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तानी संघ :


बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, सलमान आगा, शादाब खान (उप-कर्णधार), मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, सऊद शकील, हॅरिस रौफ.