Pakistan A vs Bangladesh A : 14 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियात भर मैदानात असा प्रसंग घडला की सर्वजण थक्क झाले. दोन पाकिस्तानी फलंदाज सामन्यादरम्यान एकमेकांवरच भिडले. यामध्ये एक फलंदाज तर संतापाने आरडाओरड करत स्वतःचा बॅटसुद्धा फेकताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तान शाहीन आणि बांगलादेश ‘ए’ यांच्यात झालेल्या या सामन्यात असे काही होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टॉप एंड टी-20 मालिकेत पाकिस्तान शाहीन संघ देखील सहभागी आहे. या स्पर्धेत त्यांनी आपला पहिला सामना 13 ऑगस्ट रोजी बांगलादेश ‘ए’ संघाविरुद्ध खेळला आणि 79 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तान शाहीनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून तब्बल 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश ‘ए’ संघ 16.5 षटकांत 148 धावांवर गारद झाला.
रनआउटवरून भर मैदानात राडा!
या सामन्यात पाकिस्तान शाहीनच्या डावादरम्यान एक प्रसंग घडला, जो फक्त पाकिस्तानी संघातच पाहायला मिळू शकतो. अर्धशतक झळकावून खेळणारा ख्वाजा नफी, एक धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउट झाला आणि त्यानंतर त्याने मैदानातच साथीदारावर राग काढला. नफी आणि यासिर खान यांनी पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भक्कम भागीदारी केली. 12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यासिर खान मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चुकला. चेंडू त्याच्या पॅडला लागून तेथेच थांबला. त्यावेळी नफीने धाव घेण्यासाठी धाव काढली, पण यासिरने नकार दिला. नफी परत येईपर्यंत चेंडू नॉनस्ट्रायकर टोकाला लागून बेल्स उडाल्या.
गोलंदाजीत शाद मसूद व फैजल अकरम चमकले
रनआउट झाल्यानंतर नफी संतापाने मैदानातच आपला बॅट फेकताना आणि यासिरला काहीतरी बोलताना दिसला. त्याने 31 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. गोलंदाजीत शाद मसूद आणि फैजल अकरम यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मोहम्मद वसीमने 2 तर उबैद शाह आणि माज सदाकत यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. पाकिस्तान शाहीनचा पुढील सामना 16 ऑगस्ट रोजी पर्थ स्कॉर्चर्स अकॅडमीविरुद्ध होणार आहे.
हे ही वाचा -