नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून 2025 चा आशिया कप टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. पुढील महिन्या संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतानं आशिया कप स्पर्धेसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. मात्र, त्याबाबत रोज नवनव्या अपडेट समोर येत आहेत. आशिया कपसाठी भारतीय संघात शुभमन गिल, यशस्वी जयस्वास, साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यरला स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. मात्र, बीसीसीआयनं अजून संघ निवडीबाबत अपडेट दिलेली नाही.

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होईल तर स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार असून 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. मात्र, भारताचा संघ अद्याप बीसीसीआयनं जाहीर केलेला नाही. आशिया कपचे सामने दुबई आणि अबू धाबीत होतील.

भारतीय संघाबाबत नवी अपडेट

नव्या अपडेटस नुसार निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संघात फार बदल करायचा नाही. या फॉरमॅटमध्ये जी टीम खेळत होती त्यांना पुन्हा संधी देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळं शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन देखील संधी मिळणं अशक्य मानलं जातंय.

आशिया कपमध्ये भारताची सलामी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा करु शकतात. जुलै 2024 पासून भारतासाठी टी 20 मध्ये सर्वाधिक धावा संजू सॅमसन यानं केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत त्यानं तीन शतक केली आहेत. अभिषेक शर्मा टी 20 क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. यानंतर तिसऱ्या स्थानावर तिलक वर्माला संधी मिळू शकते. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, जितेश शर्मा यांच्या नावावर विचार केला जाऊ शकतो. फिरकी गोलंदाजीसाठी वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, कुलदीप यादवला संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजी हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह करु शकतात.

आशिया कपसाठी संभाव्य टीम इंडिया : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकॅप्टन ), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वाशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह