Pakistan Cricket Board: मुलतान कसोटीत पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध (Pakistan vs England) 47 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ उडाली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी कसोटीपटू आकिब जावेद, अझहर अली, अम्पायर अलीम दार (Umpire Aleem Dar) आणि विश्लेषक हसन चीमा यांचा निवड समितीमध्ये समावेश केला आहे. अलीकडेच मोहम्मद युसूफ यांनी पॅनलचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पंच अलीम दार यांना निवड समितीमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे.


आता आकिब जावेद, अझहर अली, अम्पायर अलीम दार हे माजी खेळाडू असद शफीक आणि संघ विश्लेषक हसन चीमा यांच्यासोबत सामील झाले आहेत, ज्यांना आता निवड समितीमध्ये मतदानाचा अधिकार असेल. मात्र, पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅट) आणि जेसन गिलेस्पी (कसोटी फॉरमॅटसाठी) हे निवड समितीमध्ये मतदान सदस्य म्हणून राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय मुख्य निवडकर्ता कोण असेल? नवीन पॅनेल असेल?, हे देखील आगामी दिवसांत स्पष्ट होईल. 






पहिल्यांदाच असं काही घडलं-


पाकिस्तानच्या निवड समितीमध्ये अम्पायरचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी 15 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तान संघाची निवड करणे हे नव्या निवड समितीचे पहिले काम असेल. त्याचवेळी या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच, पहिल्या डावात 500 हून अधिक धावा केल्यानंतर एका डावाने सामना हरणारा पाकिस्तान कसोटी इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.


सामना कसा राहिला?


इंग्लंडने पाकिस्तानचा पाचव्या आणि अखेरच्या दिवशी एक डाव व 47 धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 7 बाद 823 धावांवर डाव घोषित केला. 267 धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानचा दुसरा डाव 220 धावांवर गडगडला. त्यामुळे पहिल्या डावात 500 च्यावर धावा उभारून देखील डावाच्या फरकाने पराभवाची नामुष्की झेलावी लागलेला पाकिस्तान पहिलाच संघ ठरला.


संबंधित बातमी:


Mohammed Siraj: पोलीस उपअधिक्षक मोहम्मद सिराज...; सरकारकडून मिळाला मोठा सन्मान, पगार किती मिळणार?