World Cup 2023 Points Table Update : बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने अखेर विजय मिळवला आहे. सलग चार पराभवानंतर बाबरच्या संघावर टीकेची झोड उडाली होती. पण कोलकाताच्या मैदानावर पाकिस्तान संघाने बांगलादेशचा सात विकेटने पराभव केला. या विजयासह गुणतालिकेतही मोठा फेरबदल झालाय. पाकिस्तानच्या विजयाचा फटका अफगाणिस्तानला बसला आहे. अफगाणिस्तान पाचव्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी घसरला आहे. भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.
गुणतालिकेत काय बदल झाला ?
बांगलादेशचा पराभव करत पाकिस्तान संघाने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पाकिस्तान संघाने सात सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. पाकिस्तानला सलग चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आता बांगलादेशचा पराभव करत पाकिस्तान संघाने सेमीफायनलमधील आव्हान जिवंत ठेवलेय. दुसरीकडे शाकीबच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाने विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. बांगलादेश संघाला सात सामन्यात फक्त दोन गुण मिळवता आलेत. बांगलादेश संघाला सलग सहा पराभवाचा सामना करावा लागलाय. बांगलादेशचा संघ फक्त अफगाणिस्तान संघाचा पराभव केलाय. त्यानंतर बांगलादेशला सलग सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.
टॉप 4 ची स्थिती काय ?
टीम इंडिया 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने सहा सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे समान गुण आहेत, पण न्यूझीलंड सरस रनरेटमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इतर संघाची स्थिती काय ?
श्रीलंकेचा पराभव करत अफगाणिस्तानने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली होती. पण अफगाणिस्तान संघ आता सहाव्या स्थानावर घसरलाय. पाकिस्तान संघाने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. सहा गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाचे समान गुण आहेत, पण सरस रनरेटमुळे पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी आहे. श्रीलंका संघ सातव्या स्थानी घसरलाय. श्रीलंका संघाचे सहा सामन्यात चार पराभव झालेत. नेदरलँडचा संघ चार गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश निगेटिव्ह -1.446 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.652 च्या खराब नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे.
चार पराभवानंतर पाकिस्तानचा विजय -
पाकिस्ताननं बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, विश्वचषकात आपला तिसरा विजय साजरा केला. पाकिस्तानचा सात सामन्यांमधला हा तिसरा विजय ठरला. त्यामुळं पाकिस्तानच्या खात्यात सहा गुण झाले असून, विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाकिस्ताननं पाचव्या स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीत पुन्हा स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. दरम्यान, कोलकात्यातल्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला विजयासाठी २०५ धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा अख्खा डाव २०४ धावांत आटोपला. शाहिन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वासिमनं प्रत्येकी तीन, तर हॅरिस रौफनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर पाकिस्ताननं ३२ षटकं आणि तीन चेंडूंमध्ये विजयी लक्ष्य गाठलं.