On This Day India Lost World Cup 2023 Final 19 November : 19 नोव्हेंबर.... ऑस्ट्रेलियाने वर्षभरापूर्वी दिलेली वेदना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ताजी झाली. वर्षभरापूर्वी याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला विश्वविजेते होण्यापासून रोखले होते. 19 नोव्हेंबर 2023 रोजी आयसीसी वनडे वर्ल्ड करच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भिडले होते. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित होता. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे स्वप्न स्वप्नच राहिलं. घरच्या मैदानावर भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलिया विश्वविजेता ठरला.
2023 मध्ये आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपचे आयोजन भारताने केले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत भारताने प्रत्येक सामना जिंकला. या प्रवासात त्याने ऑस्ट्रेलियाचाही पराभव केला होता. पण 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना झाला तेव्हा सगळे काही बदलले. यावेळी ऑस्ट्रेलियाने एक लाख भारतीय प्रेक्षकांसमोर जबरदस्त खेळ दाखवत भारताचा पराभव करत वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली.
भारताने अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करत चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा (47) आणि विराट कोहली (54) यांनी संघाला तुफानी सुरूवात करून दिली होती. या दोन भारतीय स्टार्सना चांगली फलंदाजी करताना पाहून पुन्हा एकदा मोठी धावसंख्या येईल असा विश्वास वाटत होता, पण तसे झाले नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. हे दोघे बाद झाल्यानंतर विकेट्सची माळ लागली. केएल राहुलने 107 चेंडूत 66 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या 240 पर्यंत नेली. पण फलंदाजीच्या विकेटवर ही धावसंख्या खुपच कमी होती. अवघ्या 43 षटकांत लक्ष्य गाठून ऑस्ट्रेलियाने हे सिद्ध केले की भारताने फलंदाजीत केलेल्या चुका गोलंदाजीने भरून काढता येणार नाहीत.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 137 धावांची खेळी खेळली आणि या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करायची हे सांगितले. त्याने 120 चेंडूंच्या खेळीत 15 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याला मार्नस लॅबुशेन (58) यांचीही चांगली साथ लाभली. या दोघांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. ट्रॅव्हिस हेडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल विराट कोहलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
बदला घेण्याची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप आणि कसोटी मालिका यांचा संबंध जोडता येत नसला तरी, तरीही भारताकडे कांगारूंकडून बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघाने कसोटी मालिका 3-1 किंवा 4-1 अशी जिंकली तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो. ऑस्ट्रेलियाने 2023 मध्येच भारताचा पराभव करून WTC फायनल जिंकली होती. त्यामुळे बदला घेण्याची संधी आहे.