On This Day, Kapil Dev Record 1983 : आजच्याच दिवशी 39 वर्षांपूर्वी कपिल देव (Kapil Dev) यांनी विक्रम रचला होता. 1983 चा क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये (1983 Cricket World Cup) खेळला जात होता. एकदिवसीय क्रिकेटमधील हा तिसरा विश्वचषक (World Cup 1983) होता. भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये समोरासमोर होते. त्या काळी झिम्बाब्वेचं आव्हान होतं. पण, या सामन्यात कपिल देव (Kapil Dev)यांनी झिम्बाबेच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं. या सामन्यातच भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार कपिल देव  यांनी 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. हा दिवस क्रिकेट चाहते आणि भारतीयांच्या हृदयावर कोरला गेला आहे.


17 धावांवर 5 विकेट, कपिल देव यांची एकाकी झुंज


कपिल देव यांनी 39 वर्षांपूर्वी या दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 चेंडूत 175 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली होती. या दिवशी एकदिवसीय सामन्यात 100 धावा करणारे कपिल देव पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले. ही त्याकाळी वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी होती. त्यानंतरही, दीर्घकाळ एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी करण्याचा हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. विशेष म्हणजे ही खेळी ज्या परिस्थितीत खेळली, त्यामुळे ही खेळी संस्मरणीय ठरली. 


आज आम्ही तुम्हाला 39 वर्षांपूर्वी खेळलेल्या या इनिंगच्या त्या खास क्षणांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत.


1983 विश्वचषकात टीम इंडियाची दमदार सुरुवात


विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव करून भारताने दमदार सुरुवात केली होती. 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघ खूप मजबूत होता. जेतेपदाच्या दावेदारांमध्ये टीम इंडियाची गणना केली जात होती. वेस्ट इंडिजसारख्या दिग्गज संघाला पहिल्याच सामन्यात पराभूत केल्यानंतर भारताची जिंकण्याची शक्यता अधिक मजबूत झाली होती. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील 3 पैकी 2 सामने जिंकले होते. चौथ्या सामन्यात भारताला झिम्बाब्वेला सामोरे जावे लागणार होते, तेव्हा टीम इंडियासाठी ही विजय फारसा अवघड वाटत नव्हता. भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


17 धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये


भारतीय संघासाठी या सामन्याची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यांनंतर मोहिंदर अमरनाथ (5), संदीप पाटील (1) आणि यशपाल शर्मा (9) यांनाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. अवघ्या 17 धावांपर्यंत मजल मारताना भारतीय संघाने सलामी आणि मधल्या फळीतील 5 मोठे फलंदाज गमावले होते. झिम्बाब्वेच्या केविन कुरन आणि पीटर रॉसन यांनी भारतीय फलंदाजांच्या दांड्या उडवल्या होत्या. टीम इंडिया 50 धावांपर्यंतही पोहोचू शकणार नाही असे वाटत होते.


कपिल देव यांची भारतासाठी एकाकी झुंज


यानंतर कर्णधार कपिल देव यांनी एकाकी झुंज दिली. या कठीण परिस्थितीत दडपणाखाली न येता, मैदानात येताच त्यांनी वेगवान फलंदाजी सुरू केली. यामुळे रॉजर बिन्नीलाही प्रोत्साहन मिळालं आणि त्याने कर्णधाराला चांगली साथ दिली. बिन्नी एकेरी धाव घेत कपिल यांना स्ट्राइक देत राहिला. 48 चेंडूत 22 धावा करून बिन्नी बाद झाला. त्यानंतर मदन लाल (17) आणि सय्यद किरमाणी (24) यांनी कपिल यांना जास्तीत जास्ता चेंडू खेळण्याची संधी दिली. कपिल देव यांनी स्फोटक फलंदाजी करत 138 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. कपिल देव यांनी या खेळीत 16 चौकार आणि 6 षटकार मारले. कपिल यांच्या खेळीमुळे भारतीय संघाने निर्धारित 60 षटकात 8 गडी गमावून 266 धावा केल्या.


टीम इंडिया 31 धावांनी विजयी


कपिल देवच्या या अतुलनीय खेळीनंतर झिम्बाब्वे संघाने 267 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. झिम्बाब्वेच्या सलामी जोडीने 44 धावांची भागीदारी केली. ठराविक अंतराने झिम्बाब्वेने विकेट गमावल्या. केविन कुरनच्या 73 धावांच्या खेळीमुळे झिम्बाब्वेला विजयाची आशा मिळाली असली, पण तो बाद होताच झिम्बाब्वेचा संघ 235 धावांवर गारद झाला. भारताने झिम्बाब्वे विरुद्धचा हा सामना 31 धावांनी जिंकला.