कोलकाता : विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावले. विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 49 वे शतक आहे. या शतकासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 49 शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीसह सचिन तेंडुलकर संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे.
विराट कोहलीने 119 चेंडूत शतकाचा टप्पा गाठला. विराट कोहली 121 चेंडूत 101 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले.
हाॅटस्टारवही विक्रम मोडित!
बर्थडेला विराट कोहली सचिनच्या विक्रमाची बरोबरी करणार का? याचीच चर्चा रंगली होती. आज बर्थडे असल्याने विराटने हा भीम पराक्रम करावा, अशीच मनोकामना प्रत्येक भारतीयाची होती. किंग कोहलीनं आज संयमी खेळी करत हा पराक्रम गाठला. विराटने शतकी धाव घेतल्यानंतर तोच प्रसंग आजवरच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे. तब्बल 4.40 कोटी लोकांनी श्वास रोखून धरला होता. हा आकडा आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा आकडा आहे.
दरम्यान, भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. विराट कोहलीने 121 चेंडूत 101 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले.
याशिवाय श्रेयस अय्यरने 87 चेंडूत 77 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
कोहली-अय्यर यांच्यात मोठी भागीदारी
प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकांत 62 धावा जोडल्या. रोहित शर्माने 24 चेंडूत 40 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचवेळी शुभमन गिल 24 चेंडूत 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शुभमन गिल केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारतीय संघाला 93 धावांवर दुसरा धक्का बसला. पण यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात १३४ धावांची भागीदारी झाली.
मात्र केएल राहुल लवकर बाद झाला. केएल राहुल 17 चेंडूत 8 धावा करू शकला. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला मार्को योन्सेनने आपला शिकार बनवले. त्याचवेळी, सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकांमध्ये 13 चेंडूत 22 धावा जोडल्या. सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. याशिवाय रवींद्र जडेजाने 15 चेंडूंत नाबाद 29 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या