ODI World Cup 2023, IND vs PAK : विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दोघांमध्ये लढत होईल. या सामन्याकडे जगभरातील क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या आहेत. वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरोधात आतापर्यंत अजेय आहे. भारताने पाकिस्तानला सातवेळा पराभूत केले आहेत. पाकिस्तानचा आठवा पराभव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव करत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अहमदाबादला होणाऱ्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. 


भारत वरचढ -


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत सात वेळा सामना झाला आहे. या सातही वेळा भारताने बाजी मारली आहे. 1992 मध् दोन्ही संघामध्ये पहिल्यांदा लढत झाली होती. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले.


कोणत्या खेळाडूकडे राहणार नजर - 


भारत-पाक सामन्यात चाहत्यांच्या नजरा सर्व खेळाडूंवर असतील. मात्र सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, गोलंदाज जसप्रीत बुमराह, पाकिस्तानी यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यावर असतील.


रोहित शर्मा


हिटमॅन अर्थात रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 131 धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध 140 धावांची इनिंग खेळली होती. आता रोहित शर्माच्या कामगिरीकडेही नजरा लागल्या आहेत.


विराट कोहली 


पाकिस्तानविरोधात प्रत्येकवेळा विराट कोहली खोऱ्याने धावा जमा करतो. यावेळीही सर्वांच्या नजरा  आक्रमक विराट कोहलीवर असतील. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 आणि अफगाणिस्तानविरुद्ध 55 धावांची खेळी खेळली. त्यामुळे महत्वाच्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा करिश्मा करण्यास सज्ज झाला आहे. 


जसप्रीत बुमराह 


भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 2 तर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 4 बळी घेतले होते. त्याशिवाय धावगतीही रोखण्यात तो यशस्वी ठरला आहे. अतिशय कंजूष गोलंदाजी करत आहे. 


मोहम्मद रिझवान 


पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचा पाठलाग करताना 131 धावांची नाबाद खेळी केली. पाकिस्तानच्या विजयाचा पाया त्याने रचला होता. बाबर आझमपेक्षा रिझवानच्या कामगिरीवर भारताचा विजय अवलंबून आहे. 


शाहीन अफरीदी


विश्वचषकाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाज अपयशी ठरले आहेत. हसन अली याने भेदक मारा केला. पण शाहीन फ्लॉपच गेला. शाहीनला दोन्ही सामन्यात फक्त 1-1 विकेट मिळाली. मात्र नव्या चेंडूने तो भारताविरुद्ध प्रभावी ठरु शकतो. 


दोन्ही संघात कोण कोण खेळाडू ?


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर.


पाकिस्तान: इमाम उल हक, फखर जमान, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, आगा सलमान, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक.