Shreyas Iyer : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाने अफगानिस्तानचा (IND vs AFG) आठ विकेट आणि 15 षटके राखत पराभव केला.  रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) वादळी खेळीच्या बळावर भारताने विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला. अफगाणिस्तानविरोधात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 25 धावांची छोटेखानी खेळी केली. या खेळीमध्ये अय्यरने एक षटकार आणि एक चौकार लगावला. अय्यरने लगावलेल्या त्या एका षटकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, यंदाच्या विश्वचषकातील सर्वात लांब षटकार मारण्याचा रेकॉर्ड श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नावावर झाला आहे.


273 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन तंबूत परतले. त्यानंतर अखेरीस श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी भारताला विजय मिळवून दिला. अय्यरने 25 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. अय्यरने मुजीबच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला. या षटकाराची लांबी तब्बल 101 मीटर इतकी होती. आताच्या विश्वचषकातील हा सर्वात लांब षटकार होय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरोधात 93 मीटर षटकार मारला. तिसऱ्या क्रमांकावर मार्को जनसन आहे, त्याने 89 मीटर दूर षटकार मारला आहे. जोस बटलर याने 88 मीटर षटकार मारला होता. श्रेयस अय्यर याने तब्बल 101 मीटर षटकार मारला आहे. श्रेयस अय्यरच्या या षटकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 































भारताचा अफगाणिस्तानवर विराट विजय, रोहितची वादळी खेळी -


रोहित शर्माच्या भारतीय संघानं विश्वचषकाच्या मोहिमेत सलग दुसरा विजय साजरा केला आहे. भारतानं दिल्लीतल्या सामन्यात अफगाणिस्तानचा आठ विकेट्स आणि 90 चेंडू राखून धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 273 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण रोहित शर्माचं खणखणीत शतक आणि त्यानं ईशान किशनच्या साथीनं दिलेली 156 धावांची दणदणीत सलामी यांच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव केला. विराट कोहलीनंही लागोपाठ दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरं केलं. त्यानं 56 चेंडूंत नाबाद 55 धावांची खेळी केली. त्याआधी, अफगाणिस्ताननं या सामन्यात 50 षटकांत आठ बाद 272 धावांची मजल मारली होती. हाशमतुल्ला शाहिदी आणि आझमतुल्ला ओमरझाईनं चौथ्या विकेटसाठी रचलेली 121 धावांची भागीदारी अफगाणिस्तानच्या डावात मोलाची ठरली. कर्णधार शाहिदीनं आठ चौकार आणि षटकारासह 80 धावांची खेळी उभारली. ओमरझाईनं दोन चौकार आणि चार षटकारांसह 62 धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराह याने चार विकेट घेतल्या होत्या. तर हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.