Arun Jaitley Stadium Fight : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाने अफगानिस्तानचा आठ विकेट आणि 15 षटके राखत पराभव केला.  रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या बळावर भारताने विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये राडा झाला. अरुण जेटली स्टेडियममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसत आहे. 


चाहत्यांमध्ये भांडणे का झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर, स्टँडवर बसलेले चाहते अचानक एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. त्याच्या शेजारी बसलेले प्रेक्षक बाजूला होतात. त्याशिवाय  काही लोक भांडण संपवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि नंतर भांडण शांत झाल्याचे दिसत आहे. व्हिडीओ सामन्यादरम्यान किंवा नंतर काढण्यात आला होता? याबाबत माहिती मिळू शकली नाही.


 पाहा व्हिडीओ....







सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय आहे.


























भारताचा अफगाणिस्तानवर विराट विजय, रोहितची वादळी खेळी -


रोहित शर्माच्या भारतीय संघानं विश्वचषकाच्या मोहिमेत सलग दुसरा विजय साजरा केला आहे. भारतानं दिल्लीतल्या सामन्यात अफगाणिस्तानचा आठ विकेट्स आणि 90 चेंडू राखून धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 273 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण रोहित शर्माचं खणखणीत शतक आणि त्यानं ईशान किशनच्या साथीनं दिलेली 156 धावांची दणदणीत सलामी यांच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव केला. विराट कोहलीनंही लागोपाठ दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरं केलं. त्यानं 56 चेंडूंत नाबाद 55 धावांची खेळी केली. त्याआधी, अफगाणिस्ताननं या सामन्यात 50 षटकांत आठ बाद 272 धावांची मजल मारली होती. हाशमतुल्ला शाहिदी आणि आझमतुल्ला ओमरझाईनं चौथ्या विकेटसाठी रचलेली 121 धावांची भागीदारी अफगाणिस्तानच्या डावात मोलाची ठरली. कर्णधार शाहिदीनं आठ चौकार आणि षटकारासह 80 धावांची खेळी उभारली. ओमरझाईनं दोन चौकार आणि चार षटकारांसह 62 धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराह याने चार विकेट घेतल्या होत्या. तर हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.