नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा (Australia) धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (Glane Maxwell ) विश्वविक्रमी खेळी केली आहे. मॅक्सवेलने (Glane Fastest World Cup century) केवळ 40 चेंडूत वादळी शतक ठोकलंय. कोणत्याही विश्वचषकातील हे सर्वात वेगवान शतक आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने ही कामगिरी केली. यापूर्वी याच विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा अॅडन मारक्रमने (Aiden Markram) 49 चेंडूत शतक ठोकलं होतं. मात्र मॅक्सेवलने त्याच्या पुढे जात तुफानी खेळी केली. मॅक्सेवल 106 धावा करुन माघारी परतला. मात्र त्याने 44 चेंडूच्या खेळीत 9 चौकार आणि 8 षटकार ठोकून विश्वविक्रमी खेळी केली. दरम्यान, मॅक्सवेलची वादळी खेळी आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलँडविरुद्ध 50 षटकात 8 बाद 399 धावांची मजल मारली. आता नेदरलँडला विजयासाठी 400 धावांची गरज आहे.


 






मॅक्सवेल, वॉर्नरची शतकी खेळी


आजच्या सामन्यात मॅक्सवेलने वादळी खेळी साकारताना 44 चेंडूत 106 धावांची खेळी साकारली. त्यात 8 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. तर, डेविड वॉर्नरने 93 चेंडूत 104 धावांची खेळी केली. वॉर्नरने 3 षटकार आणि 11 चौकार लगावले. त्याशिवाय, स्टिव्ह स्मिथ याने 71 आणि मार्नस लाबुशेनने 62 धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या आक्रमणसमोर नेदरलँड्सचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ दिसले. नेदरलँड्सकडून लोगान वॅन बीक या गोलंदाजाने 4 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन आक्रमणाला वेसन घालण्याचा प्रयत्न केला.  


विक्रमी वॉर्नर 


डेविड वॉर्नरने आज विश्वचषकातील आपले सहावे शतक झळकावले.  आजच्या शतकाने वॉर्नरने सचिन तेंडुलकरच्या शतकाशी बरोबरी केली आहे. क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक शतकाचा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने सात शतके झळकावली आहेत. वॉर्नरने वर्ल्डकपमधील  23 सामन्यात 23 शतके झळकावली आहेत. 


आपल्या सहाव्या शतकासह डेव्हिड वॉर्नरने माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले. पाँटिंगने पाच विश्वचषकातील 46 सामन्यांमध्ये 42 डावात पाच शतके झळकावली होती. आता डेव्हिड वॉर्नरने सहा शतकांसह त्याला मागे टाकले आहे. या यादीत मार्क वॉ (4 शतके), अॅरॉन फिंच (3 शतके) आणि मॅथ्यू हेडन (3 शतके) यांची नावे आहेत.


एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतकी खेळी


ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) - 40 चेंडू विरुद्ध नेदरलँड, 2023* (आज)
एडन मारक्रम (दक्षिण आफ्रिका) – 49 चेंडू वि. श्रीलंका 2023
केविन ओब्रायन (आयर) - 50 चेंडू वि. इंग्लंड, 2011
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – 51 चेंडू वि. श्रीलंका 2015