"Best pace attack in the world." भारतीय क्रिकेटबद्दल हे शब्द ऐकायला थोडं जडच जाते, कारण 1970 पासून 2019 पर्यंत भारतीय संघाबाबत असा उच्चार ऐकायलाच मिळाला नाही. 1970 मध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाकडे पाहून हा उच्चर केला जायचा. त्यानंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला हा टॅग मिळाला. पण विश्वचषकाच्या 13 व्या हंगामात भारतीय संघाच्या गोलंदाजीला Best pace attack in the world असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज... ही तिकडी भारताचा वेगवान मारा संभाळत आहे. पण रोहित शर्मा या तिन्ही गोलंदाजांना एकत्र खेळवणार का? भारताची तयारी पाहता फक्त दोन प्रमुख वेगवान गोलंदाजाला घेऊन मैदानात उतरणार हे दिसतेय. तिसरा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याचा वापर केला जाणार आहे. त्याशिवाय शार्दूल ठाकूर आणि अश्विन याच्यापैकी एकाला प्लेईंग 11 मधील संधी निश्चित मानली जातेय. 


मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह या तिन्ही वेगवान गोलंदाजाची शैली वेगळी आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्याची संधी रोहित शर्माने सोडू नये. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करु शकणाऱ्या गोलंदाजाला खेळवण्यापेक्षा प्रमुख गोलंदाजाला खेळवल्यास भारताला फायदा होऊ शकतो. विचार करा.. सिराज, शामी आणि बुमराह हे तोफखाने एकाचवेळी समोर आल्यावर प्रतिस्पर्धी फलंदाजाची भंबेरी उडेल, यात शंकाच नाही. 


जसप्रीत बुमराहने दुखापतीनंतर जोरदार कमबॅक केले. तेव्हापासून बुमराहने प्रत्येक सामन्यात विकेट घेतलीच आहे. दुसरीकडे मोहम्मद सिराज जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. सिराज याने आशिया चषकाच्या फायनलमध्ये 21 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट घेऊन खळबळ माजवली होती. तर मोहम्मद शामी याने ऑस्ट्रेलियाविरोधात पाच विकेट घेत आपलीही दावेदारी दिली होती. सिराज, शामी आणि बुमराह सध्या भन्नाट फॉर्मात आहेत, त्यामुळे महत्वाच्या सामन्यात त्यांना एकत्र संधी द्यायला हवीच.


सिराज आणि बुमराह यांना पहिली पसंती असल्याचे मागील काही सामन्यात दिसतेय. पण मोहम्मद शामी आयसीसीसारख्या स्पर्धेत ट्रम्प कार्ड ठरु शकतो, हे रोहितने विसरता कामा नये. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये शामी तिसऱ्या क्रमांकावर आहे. शामी 2015 आणि 2019 विश्वचषकात भारतीय संघाचा सदस्य होता. या दोन विश्वचषकात शामीने 11 सामन्यात 31 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. फक्त 5 धावा प्रतिषटक खर्च करत शामीने 18 च्या सरासरीने 31 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात शामीची कामगिरी अधिक चांगली होते.  


आयसीसीने खेळपट्टीवर गवत ठेवण्याचा नियम केला आहे. त्यामुळे रोहित शर्माने आघाडीच्या तिन्ही गोलंदाजासह विश्वचषकात उतरायला हवं. त्याशिवाय डे नाइट सामने असल्यामुळे दवचा परिणाम होणार आहे. दव असल्यास फिरकी गोलंदाजी करणं, कठीण जातं. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजी तगडी असायला हवी. प्रत्येक सामन्यात शक्य नाही... कारण, विश्वचषकात आपल्याला नऊ सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत अखेरच्या सामन्यापर्यंत खेळाडू ताजेतवाने राहायला हवेत. त्यामुळे  इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यासारख्या महत्वाच्या सामन्यात वेगवान तिकडीला मैदानात उतरवायला हवे. इतर सामन्यात रोटेशन पद्धतीने आराम द्यायला हवा.  जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज... हे त्रिकुट एकत्र खेळल्यास Best pace attack in the world असे भारतीय गोलंदाजीबात म्हटल्यास वावगं वाटयला नको. फलंदाजांना पोषक खेळपट्ट्या असल्या तरीही या तिन्ही गोलंदाजामध्ये विकेट घेण्याची क्षमता आहे.


आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला खेळवल्यास किती फायदा मिळेल, हे आताच सांगणं कठीण आहे. पण सिराज, शामी अन् बुमराह या त्रिकुटाला खेळवल्यास नक्कीच फायदा होईल. आठव्या क्रमांकावरील फलंदाज फार फार तर 20 ते 30 धावा करेल, पण आघाडीचे फलंदाज फॉर्मात असताना इतक्या खाली फलंदाजी जाईल का? सातव्या क्रमांकावर रविंद्र जाडेजा फलंदाजीला उतरतो, त्यावरुच फलंदाजीची ताकद पाहा... तरिही आपल्याला आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा गोलंदाज कशाला हवाय.. महत्वाच्या सामन्यात बुमराह, सिराज आणि शामी या तोफखान्याला उतरवून प्रतिस्पर्धी फंलदाजांना उद्धवस्त करायला हवं.