IND Vs AUS, Innings Highlights :  भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे ऑस्ट्रेलियाची भंबेरी उडाली. निर्धारित 49.3 षटकात ऑस्ट्रेलियाने 199 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला अर्धशतक ठोकता आले नाही. तर 9 फलंदाज 30 धावसंख्या ओलांडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनी संघर्ष केला, पण मोठी खेळी करता आली नाही. स्मिथने 46 तर वॉर्नरने 41 धावांची खेळी केली. भारताच्या फिरकी त्रिकुटाने 30 षटकात फक्त 104 धावा खर्च केल्या. अश्विन, कुलदीप आणि रविंद्र जाडेजा यांनी एकूण सहा विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजाने तीन विकेट घेतल्या. तर कुलदीपने दोन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी 200 धावांचे आव्हान आहे.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. डेविड वॉर्नर आणि स्मिथ यांनी संघर्ष केला. पण इतर फलंदाजांनी लोटांगण घेतले. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही, 30 धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. 


जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला शून्यावर बाद करत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. पहिली विकेट झटपट गेल्यानंतर डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या अनुभवी फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही एकेरी दुहेरी धावसंख्या घेत फलंदाजी सुरु ठेवली. ही जोडी धोकादायक ठरते की काय असे वाटत असतानाच कुलदीप यादवने डेविड वॉर्नरचा अडथळा दूर केला. वॉर्नर आणि स्मिथ यांच्यामध्ये 69 धावांची भागिदारी केली. डेविड वॉर्नर याने 52 चेंडूत 41 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नरने 6 चौकार ठोकले. वॉर्नरपाठोपाठ स्मिथही तंबूत परतला. जाडेजाच्या जबरदस्त चेंडूवर स्मिथ त्रिफाळाचीत झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. स्मिथने 71 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये स्मिथे 5 चौकार लगावले. 


मार्नस लाबुशेन याला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी खेळी करता आली नाही. मार्नस लाबुशेन याने 41 चेंडूत एका चौकारासह 27  धावांचे योगदान दिले. अनुभवी ग्लेन मॅक्सवेल यालाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेल अवघ्या 15 धावांवर कुलदीप यादवचा शिकार ठरला. अॅलेक्स कॅरी याला तर खातेही उघडता आले नाही. रविंद्र जाडेजाच्या चेंडूवर कॅरी गोल्डन डकचा शिकार ठरला. कॅमरुन ग्रीनला आठ धावांवर अश्विनने तंबूत धाडले. पॅट कमिन्स याने ऑस्ट्रेलियाच्या डावाचा पहिला षटकार मारला. पण कमिन्सलाही मोठी खेळी करता आली नाही. कमिन्सने 24 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावांचे योगदान दिले. मिचेल स्टार्कने अखेरीस 28 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला 199 धावांपर्यंत पोहचवले. 


फिरकी त्रिकुटाचा भेदक मारा -


भारताच्या फिरकी त्रिकुटाने 30 षटकात फक्त 104 धावा खर्च केल्या. अश्विन, कुलदीप आणि रविंद्र जाडेजा यांनी एकूण सहा विकेट घेतल्या.


रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवले. रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाचा मध्यक्रम उखडून टाकला. रविंद्र जाडेजाने 10 षटकात फक्त 28 धावा खर्च करत तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडले. जाडेजाने दोन षटकेही निर्धाव टाकली. जाडेजाने आपल्या दहा षटकांमध्ये स्टिव्ह स्मिथ, लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांना बाद केले.  


कुलदीप यादव यानेही अचूक टप्प्यावर मारा करत कांगारुंना रोखले. कुलदीप यादवने 10 षटकात 42 धावा खर्च केल्या. यादमर्यान त्याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीपने धोकादायक डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मोक्याच्या क्षणी बाद केले. 


वनडेमध्ये कमबॅक करणाऱ्या अश्विन यानेही भेदक मारा केला. अश्विनच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चाचपडत होते. अश्विनने 10 षटकात 34 धावा खर्च करत एक विकेट घेतली. अश्विन याने कॅमरुन ग्रीनला तंबूचा रस्ता दाखवला. अश्विन याने एक षटक निर्धावही फेकले. 


जसप्रीत बुमराहने 10 षटकात 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि सिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.