Pakistan vs New Zealand Test : न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात पार पडलेला पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णीत सुटला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना कराचीच्या क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. सामन्याच्या शेवटच्या डावात न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी जवळपास 8 षटकांत 80 धावांची गरज होती, पण खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला आणि त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. सामन्यात सर्वात आधी पहिल्या डावात पाकिस्तानने 438 धावा केल्या होत्या, त्यानंतर न्यूझीलंजने 612 धावांवर डाव घोषित केला. मग पाकिस्तानने दुसरा डाव 8 बाद 338 धावांवर घोषित केला. ज्यानंतर सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला दुसऱ्या डावात 15 षटकात 138 धावा करायच्या होत्या. पण न्यूझीलंड संघाने 7.3 षटकात 1 बाद 61 धावा केल्या खराब प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला आणि सामना अनिर्णीत सुटला.






केन विल्यमसनचे नाबाद द्विशतक


या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केननं ठोकलेलं अप्रतिम द्विशतक खास गोष्ट ठरली. सामन्यात न्यूझीलंड संघाने चौथ्या दिवशी 9 विकेट गमावत 612 धावा करून डाव घोषित केला. न्यूझीलंडकडून माजी कर्णधार केन विल्यमसनने यावेळी नाबाद द्विशतक झळकावले. केन विल्यमसन 395 चेंडूत 200 धावा करून नाबाद परतला. त्याने या खेळीत 21 चौकार आणि 1 षटकार लगावला. केन विल्यमसनचे कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे द्विशतक होते. यामुळेच न्यूझीलंडला पाकिस्तानवर 174 धावांची आघाडी मिळाली. बाबर आझम आणि आगा सलमानच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तानने पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या.


यावेळी पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 161 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानचा कर्णधाराने 280 चेंडूत 161 धावा केल्या. बाबर आझमशिवाय आगा सलमानने शतक झळकावलं. आघा सलमानने 155 चेंडूत 103 धावांचे योगदान दिले. आघा सलमाननं आपल्या खेळीत 17 चौकार मारले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज टिम साऊदीने न्यूझीलंडकडून सर्वाधिक 3 बळी घेतले. एजाज अहमद, मायकल ब्रेसवेल आणि ईश सोधीला 2-2 यश मिळाले. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.


हे देखील वाचा-