Netherlands vs Sri Lanka : वर्ल्डकप कोण जिंकणार? ही चर्चा गल्ली ते दिल्ली ते पार जगाच्या पाठीवर होत असतानाच लिंबू टिंबू असलेल्या नेदरलँडने स्पर्धेत दाखवलेला बाणा नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. वर्ल्डकप कोणीही जिंकेल पण नेदरलँडची कामगिरी निश्चितच उजवी झाली आहे. मागील सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला तगडा हादरा दिल्यानंतर आजही त्यांनी बाजी पलटवत श्रीलंकेविरुद्धही दमदार कामगिरी केली.  






श्रीलंकेलाही रडवलं 


नेदरलँडने श्रीलंकेसमोर 263 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेदरलँडचा संघ 49.4 षटकांत सर्वबाद 262 धावांवर आटोपला. मात्र, एकवेळ 6 फलंदाज 91 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र असे असतानाही संघाला 262 धावांपर्यंत मजल मारली. विश्वचषकाच्या इतिहासातील नेदरलँड्सची ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. नेदरलँड्ससाठी एंजेलब्रँडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 82 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. व्हॅन विकने 75 चेंडूत 59 धावांचे योगदान दिले. याशिवाय अकरमनने 32 चेंडूत 29 धावा केल्या. मात्र, नेदरलँडच्या बहुतांश फलंदाजांनी निराशा केली. नेदरलँड संघाच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.






नेदरलँडला पहिला धक्का 7 धावांवर बसला. यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली. एकवेळ नेदरलँडचे 6 फलंदाज पॅव्हेलियनकडे वळले होते. पण यानंतर एंजेलब्रंट आणि व्हॅन विक यांनी जबाबदारी पार पाडत 130 धावांची भागीदारी झाली. यामुळे नेदरलँडचा संघ 262 धावांपर्यंत मजल मारू शकला.






'चोकर्स'विरोधात दुसऱ्यांदा 'ऑरेंज' क्रांती


दक्षिण आफ्रिकेला तगडा हादरा वर्ल्डकपमध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेदरलँडने मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मात देत स्पर्धेतील सनसनाटी विजयाची नोंद केली. ही कामगिरी नेदरलँडच्या ऑरेंज आर्मीने दुसऱ्यांदा केली. यापूर्वी, गेल्यावर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही त्यांनी दक्षिण आफ्रिकेला तगडा हादरा दिला होता. वर्ल्डकप 2023 मध्ये भारतात तीन दिवसांत दोन मोठे अपसेट झाले आहेत. 15 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानने विश्वविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. मंगळवारी (17 ऑक्टोबर) नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात नेदरलँड्सचा हा तिसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी नामिबिया (2003) आणि स्कॉटलंड (2007) यांचा पराभव केला आहे. विश्वचषकात नेदरलँड्सने एकूण 23 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या