India vs Australia 3rd Test, Nathan Lyon :  भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने (Nathan Lyon) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. शुभमन गिलला बाद केल्यानंतर नॅथन लायन भारताविरुद्धचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला. त्याने या बाबतीत श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरन याला मागे टाकलं  आहे. गिलच्या विकेटसह, त्याने भारताविरुद्ध त्याच्या 106 विकेट्स पूर्ण केल्या आहेत, तर मुथय्या मुरलीधरनने त्याच्या कारकिर्दीत भारताविरुद्ध 105 बळी घेतले आहेत.


भारताविरुद्ध लायन अव्वल स्थानावर  


नॅथन लायन हा भारताविरुद्धचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला आहे. याशिवाय मुरलीधरन दुसऱ्या, वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज लान्स गिब्स 63 विकेट्ससह तिसऱ्या आणि इंग्लंडचा माजी गोलंदाज डेरेक अंडरवूड 62 बळींसह चौथ्या क्रमांकावर आहे. 


नॅथन लायन चांगल्या फॉर्मात


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नॅथन लायनने आतापर्यंत 15 विकेट्स घेतल्या आहेत. लायन हा या ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. याच यादीत जाडेजा पहिल्या तर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.


भारताविरुद्ध सर्वात यशस्वी फिरकीपटू


नॅथन लायन - 106* विकेट्स.


मुथय्या मुरलीधरन - १०५ विकेट्स.


लान्स गिब्स - ६३ विकेट्स.


डेरेक अंडरवुड - 62 विकेट्स.


नॅथन लियॉनची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द  


ऑगस्ट 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नॅथन लायनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 118 कसोटी, 29 एकदिवसीय आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने 31.34 च्या सरासरीने एकूण 475 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 46 च्या सरासरीने एकूण 29 बळी घेतले आहेत आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना 48 च्या सरासरीने फक्त 1 बळी घेतला आहे. त्याचबरोबर त्याने 9.6 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. लायन प्रामुख्याने संघासाठी कसोटी क्रिकेटच खेळतो.


ऑस्ट्रेलियाला माफक लक्ष्य


ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 76 धावा करायच्या आहेत. सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारतानं 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून आता तिसऱ्या दिवशी 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे


हे देखील वाचा-