Ashwin Record : भारतीय भूमीत सुरु बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (BGT 2023) मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने आपल्या नावावर एक मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याने या डावात एकूण 3 विकेट्स धेत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनुभवी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना मागे टाकलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अश्विनने तीन बळी घेतले. आधी पीटर हँड्सकॉम्बची विकेट घेत त्याने कपिल देव यांच्या 687 आंतरराष्ट्रीय विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर अश्विनने अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवताना कपिल देव यांचा रेकॉर्डही मोडला. त्यानंतर अश्विनने नॅथन लायनला बोल्ड करून त्याच्या आंतरराष्ट्रीय विकेटची संख्या 689 वर नेली.


इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनच्या या अप्रतिम गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ फारशी आघाडी घेऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियन संघ 197 धावांवर सर्वबाद झाला. त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात केवळ 109 धावा केल्या होत्या. पण भारताचा दुसरा डावही 163 धावांवर आटोपल्याने ऑस्ट्रेलियाला केवळ 76 धावांची गरज आहे. दरम्यान अश्विनच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 466, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 151 आणि आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 72 विकेट्स आहेत. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.


हे दोन गोलंदाज अश्विनच्या पुढे


अनिल कुंबळे हा भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेणारा गोलंदाज आहे. कुंबळेने 403 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 501 डावांमध्ये गोलंदाजी करताना एकूण 956 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर हरभजन सिंगचं नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. हरभजनने 367 सामन्यांच्या 444 डावात 711 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर आता आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अश्विनने आतापर्यंत 269 सामन्यांच्या 347 डावांमध्ये 689 बळी घेतले आहेत.


ऑस्ट्रेलियाला माफक लक्ष्य


ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 76 धावा करायच्या आहेत. सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारतानं 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून आता तिसऱ्या दिवशी 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे


हे देखील वाचा-