Rohit Sharma Captaincy : टी20 विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून चांगला पर्याय नाही. त्याला टी 20 संघातूनही वगळायला हवं, असं वक्तव्य कोलकात्याचा माजी संचालक जॉय भट्टाचार्य यांनी केलेय. ते क्रिकबजच्या एका शोमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विश्वचषकात कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहला पसंती दर्शवली. दरम्यान, जानेवारी 2024 मध्ये बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टी20 विश्वचषकात रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल, असं स्पष्ट सांगितलं होतं. आता विश्वचषक स्पर्धा महिन्याभरावर राहिल्यानंतर रोहित शर्माला टी 20 संघाची धुरा सोपवण्याच्या निर्णायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भट्टाचार्य यांच्यामते रोहित शर्मा संघाचा कर्णधार झाल्यास अडचणी वाढतील. 



जॉय भट्टाचार्य क्रिकबज सोबत बोलताना म्हणाले की, "रोहित शर्माला T20 विश्वचषकासाठी भारताचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय संघासाठी अडचणीचा ठरु शकतो. यावेळी टी-20 फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी शर्मा योग्य पर्याय नाही. रोहित शर्माचा मी सन्मान करतो, तो शानदार खेळाडू आहे. पण यावेळी रोहित शर्मा आऊट ऑफ फॉर्म आहे. विराट कोहली, यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल त्याच्यापेक्षा चांगल्या फॉर्मात आहेत. सलामीसाठी ते चांगले दावेदार आहेत. रोहित शर्मा कर्णाधार असल्यामुळे आता सलामीला उतरणार. म्हणजेच इन फॉर्म असणाऱ्या एका खेळाडूला खाली खेळावं लागेल अथवा संगाबाहेर बसावं लागणार आहे."






जॉय भट्टाचार्य यांच्यामते,  'रोहित शर्मा सध्या फॉर्ममध्ये नाही. पण तो कर्णधार असल्याने, 15 सदस्यीय विश्वचषक संघात स्थान निश्चित मिळवेल. पण त्यामुळे यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल किंवा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यापैकी एकाला बाहेर बसावं लागेल.' भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह कर्णधारपदासाठी चांगला पर्याय असल्याचं भट्टाचार्य यांनी सांगितलं.