मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2008 मध्ये झालेला सिडनीतील कसोटी सामना हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त सामना समजला जातो. या सामन्यात पंचांनी अतिशय चुकीचे निर्णय घेतले होते, ज्यामुळे क्रिकेट विश्वाच्या नजरा या सामन्याकडे वळल्या होत्या. आता आयसीसीचे माजी पंच स्टीव्ह बकनर यांनी 12 वर्षांनंतर या सामन्याबाबत खुलासा केला आहे. 2008 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामधली कसोटी मालिकेदरम्यान दोन चुका केल्याचं स्टीव्ह बकनर यांनी 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीमध्ये खेळवलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह बकरन आणि मार्क बेन्सन हे पंच होते. या सामन्यात दोन्ही पंचांनी काही चुकीचे निर्णय दिले, ज्यामुळे भारताला या सामन्यात 122 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे या सामन्यातील वादग्रस्त निर्णयांमुळे भारतीय संघाने स्टीव्ह बकनर आणि मार्क बेन्सन या दोन पंचांची तक्रार केली होती.


स्टीव्ह बकनर यांच्या दोन चुका
या सामन्याच्या 12 वर्षांनी स्टीव्ह बकनर यांनी अखेरीस आपल्या चुका स्वीकारल्या आहे. बकनर म्हणाले की, मी 2008 मध्ये सिडनी कसोटीदरम्यान दोन चुका केल्या. माझी पहिली चुकी होती की, भारत चांगली कामगिरी करत असताना, मी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला शतक करण्यास दिलं.


माझी दुसरी चूक ही सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी होती, कदाचित त्यामुळे भारताचा पराभव झाला. या कसोटी सामन्यात दोन चुका करणारा मी पहिला पंच होतो का? तरीही या दोन चुका मला बेचैन करतात. या चुका का झाल्या हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.


अँड्र्यू सायमंड्सला जीवदान
अँड्र्यू सायमंड्सला जीवदान देणं हा पहिला चुकीचा निर्णय असल्याचं स्टीव्ह बकरन यांचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियाचं संघ अतिशय अडचणीत होता. सहा विकेट्सच्या मोबदल्यात संघाने केवळ 135 धावाच केल्या होत्या. सायमंड्स त्यावेळी 30 धावांवर खेळत होता. तेव्हा भारताच्या ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर चेंडू सायमंड्सच्या बॅटला चाटून यष्टीरक्षकाकडे गेला. परंतु बकनर यांनी त्याला बाद ठरवलं नाही. यानंतर सायमंड्सने 160 धावांची खेळी रचत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 463 वर नेऊन पोहोचवली.


द्रविड बाद देण्याचा चुकीचा निर्णय
राहुल द्रविडला बाद ठरवलं ही आपली दुसरी चूक असल्याचं बकनर म्हणाले. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारतासमोर 72 षटकात 333 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सौरव गांगुलीसोबत राहुल द्रविड फलंदाजी करत होता. परंतु 34व्या षटकात 38 धावा केल्या असताना बकनर यांनी द्रविडला सायमंड्सच्या गोलंदाजीवर झेलबाद ठरवलं. रिप्लेमध्ये पाहिलं असता चेंडू द्रविडच्या बॅटऐवजी पॅडला लागून गेला होता. या सामन्यात भारताचा 122 धावांनी पराभव झाला होता.


हरभजन आणि सायमंड्समधील 'मंकी गेट' प्रकरण
स्टीव्ह बकरन यांच्या चुकांशिवाय भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंह आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू अँड्र्यू सायमंड यांच्यामध्ये झालेल्या मंकी गेट प्रकरणामुळेही ही मालिका वादग्रस्त ठरली होती. वाद एवढा वाढला की आयसीसीला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.