नवी दिल्ली : देशात आज सहाव्या टप्प्यात मतदान होत असून 8 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात मतदान होत आहे. देशातील 58 जागांसाठी या टप्प्यात मतदान होत असून झारखंडमधील (Jharkhand) 4 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये, रांची मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्जचा धडाकेबाज फंलदाच महेंद्रसिंह धोनीने (MS dhoni) रांची येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. शांत अन् संयमी असलेल्या माहीने जबाबदार नागरिक असल्याचे दाखवून दिले. टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि भाजप खासदार गौतम गंभीरनेही दिल्लीतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा (Voting) हक्क बजवला आहे.


मुंबईसह देशातील अनेक राज्यात पाचव्या टप्प्यात मतदान झाले. मुंबईकर असलेल्या सचिन तेंडुलकरने पाचव्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर, आता महेंद्रसिंह धोनीने सहाव्या टप्प्यात रांची येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. महेंद्रसिंह धोनी येणार असल्याची माहिती अगोदरच मतदान केंद्रावरील सुरक्षा रक्षक व पोलिसांना देण्यात आली होती. कारण, धोनीला पाहण्यासाठी मतदान केंद्रावर चाहत्यांची गर्दी होईल, हा अंदाज होताच. माहीची गाडी केंद्रावर येताच चाहते व माध्यमांनी त्याच्या गाडीला गराडा घातला होता. मात्र, पोलिस व मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी धोनीला थेट मतदान केंद्रात नेले. धोनीने तेथे सहकुटुंब मतदानाच हक्क बजावला. त्यावेळी, पत्नी साक्षी व माहीच्या आई-वडिलही मतदान करण्यासाठी आले होते. श्यामली येथील मतदान केंद्रावर धोनी परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.  






गंभीरनेही केलं मतदान


देशातील सहाव्या टप्प्यात झारखंड राज्यातील रांची येथे धोनीने मतदान केले. तर, टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि भाजप खासदार गौतम गंभीरनेही दिल्लीतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. गंभीरने गत 2019 च्या निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवार अरविंदसिंह लवली यांचा तब्बल 3 लाख 91 हजार मतांनी पराभव करत गंभीरने विजय मिळवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकांपूर्वीच गंभीरने ट्वटि करुन राजकीय जीवनातून बाहेर होत असल्याचं सांगितलं आहे. 


दरम्यान, धोनीने ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, तिथे 378 मतदान आहे. लाल रंगाच्या कारमधून धोनी कुटुंबासह मतदान केंद्रावर आला होता.यावेळी, केवळ हलकेसे स्माईल देऊन धोनीने चाहत्यांना अभिवादन केले. तर, माध्यमांशी बोलणे टाळल्याचे दिसले.


कपिल देव यांनीही बजावला हक्क


देशाला 1983 मध्ये विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देव यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. आपण लोकशाहीत राहत असल्याचा मला आनंद आहे. आपल्या मतदारसंघासाठी योग्य व्यक्तीला निवडण्याचा अधिकार आपणास आहे. सरकार काय करतंय, त्यापेक्षा आपण काय करू शकतो, हे महत्त्वाचं आहे, असे कपिल देवने मतदान केल्यानंतर म्हटले.