MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. मात्र, अजूनही त्याची फॅन फॉलोइंग थोडीशीही कमी झालेली नाही. धोनी सोशल मीडियावर सक्रीय नसतो. फावल्या वेळेत त्याला कुटुंब आणि मित्रांसह वेळ घालवायला आवडतं. आयपीएलमध्ये धोनी सध्या चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलचा पुढचा हंगाम धोनीसाठी शेवटचा असेल, अशी चर्चा आहे. यातच धोनी चित्रपट श्रेत्रात एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आलीय. थालापथी विजयसोबत तो पहिला चित्रपट करणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल, अशीही माहिती समोर आलीय. 


महेंद्रसिंह धोनीने स्वतः साऊथ सुपरस्टार विजयला फोन करून हा चित्रपट करण्यास सांगितलंय. अशा परिस्थितीत आता विजय हा चित्रपट करणार असल्याचे मानले जातंय. चेन्नई सुपर किंग्जसोबत एमएस धोनीचं नातं एक दशक जुनं आहे. त्यामुळं तो तामिळनाडूमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामुळंचं धोनीला थाला म्हणजेच नेता म्हटलं जातं. एमएस धोनीने काही काळापूर्वी त्याचं प्रोडक्शन हाऊस लॉन्च केलं होतं. ज्या अंतर्गत नुकतीच एक अॅनिमेशन मालिका देखील बनवण्यात आली. याआधी एमएस धोनीच्या आयुष्यावर बनलेल्या 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातही धोनीनं पैसे गुंतवल्याची माहिती समोर आली होती. 


धोनीची एकदिवसीय कारकीर्द
धोनीनं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 10 हजार धावांचा टप्पा गाठलाय. त्यानं एकदिवसीय सामन्यात एकूण 350 सामने खेळले आहेत. यातील 297 डावात 50.57 च्या सरासरीनं 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 87.56 इतका होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 10 शतक आणि 73 अर्धशतकांची नोंद आहे. एवढेच नव्हेतर 84 वेळा नाबाद राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत तो तब्बल 10 वर्ष पहिल्या दहामध्ये होता.  


हे देखील वाचा-