World Cup 2019 SF, IND vs NZ : न्यूझीलंडने 2019 च्या विश्वचषकात उपांत्य सामन्यात भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाच्या कटू आठवणी आजही भारतीयांच्या मनात आहेत. धोनी धावबाद झाल्यानंतर भारतीयांचे स्वप्न तुटले होते. न्यूझीलंडविरोधातील उपांत्य फेरीतील पराभवानंतरच्या कटू आठवणी तत्कालीन फलंदाजी कोच संजय बांगर यांनी सांगितल्या आहेत. 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवानंतर एमएस धोनी, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये ढसाढसा रडले होते.  पराभवानंतर भारतीय खेळाडूंचे अश्रू अनावर झाले होते. 


उपांत्य फेरीत स्वप्नाचा चक्काचूर -


2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले होत. न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला होता. या पराभवामुळे अनेकांचे स्वप्न तुटले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 विकेटच्या मोबदल्यात 239 धावांपर्यंत मजल मारली होती. भारतीय संघाला विजयासाठी 240 धावांचे आव्हान मिळाले होते. पण भारतीय संघाचा डाव 49.3 षटकात 221 धावांत आटोपला. या पराभवामुळे टीम इंडियाचे फायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न तुटले होते. या पराभवानंतर लाखो भारतीयांसोबत खेळाडूंनाही धक्का बसला होता. आजही ती जखम भळभळत आहे. भारताचे तत्कालीन फिल्डिंग कोच संजय बांगर यांनी त्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंची ड्रेसिंग रुमधील अवस्था वाईट झाल्याचे सांगितले. बांगर म्हणाले की, एमएस धोनी, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यासारखे खेळाडू ढसढसा रडले होते.  ड्रेसिंग रुममध्ये सिनिअर खेळाडूंना आपले अश्रू रोखता आले नव्हते. 






सामन्यात काय झालं होते ?


न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था अतिशय खराब झाली होती. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त पाच धावांच्या आत तंबूत परतले. 24 धावांवर चार विकेट गेल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाचा पराभव होणार, असेच वाटले. पण एमएस धोनी आणि रवींद्र जाडेजा यांनी बाजी पलटवली होती. दोघांनीही एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत भारताच्या विजायाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रवींद्र जाडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती. या खेळीत जाडेजाने 4 षटकार आणि 4 चौकार लगावले होते. माजी कर्णधार एमएस धोनी याने 72 चेंडूत संयमी 50 धावांचे योगदान दिले होते. मोक्याच्या क्षणी धोनी धावबाद झाला अन् लाखो भारतीयांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. 2019 च्या विश्वचषकात भारताच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. न्यूझीलंडच्या मॅट हेनरी याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या होत्या. ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या होत्या. लॉकी फर्गुसन आणि जिमी नीशम यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.