MPL 2023 : महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आठव्या  दिवशी फिरकीपटू श्रेयस चव्हाण(४-२०) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा ८ गडी राखून पराभव केला. सलग तीन विजयासह कोल्हापूरने प्ले ऑफ मधील आपले स्थान निश्चित केले. या विजयामुळे कोल्हापूर टस्कर्स संघाने ६ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर, छत्रपती संभाजी किंग्ज संघाला स्पर्धेत एकही विजय न मिळवता आल्यामुळे त्यांचे त्या स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आले आहे.  

  
 
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून छत्रपती संभाजी किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. कोल्हापूरच्या आत्मन पोरेने संभाजी किंग्जच्या सौरभ नवलेला पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद केले. तर दुसऱ्या षटकात निहाल तुसमदने ओंकार खाटपेला झेल बाद करून संघाला दुसरा झटका दिला. मुर्तझा ट्रंकवालाने एकाबाजूने लढताना ३६ चेंडूत २चौकार व १ षटकारासह सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. त्यानंतर ओम भोसलेच्या २२ धावा, आनंद ठेंगेच्या १८ वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. कोल्हापूरच्या श्रेयस चव्हाण(४-२०), अक्षय दरेकर(२-१२), सिद्धार्थ दरेकर(२-८), निहाल तुसमद(१-४), आत्मन पोरे (१-२५) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा डाव १९.४ षटकात १०१ धावांवर संपुष्टात आला.      


१०१ धावांचाचा पाठलाग करताना कोल्हापूर टस्कर्स संघाने  सलामवीर केदार जाधव(१५धावा) व अंकित बावणे(३७ धावा) या जोडीने २६ चेंडूत ३२ धावांची भागीदारी केली. केदार जाधवला हितेश वाळुंजने दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या व स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या नौशाद शेखने २४ चेंडूत ३चौकाराच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. नौशाद व अंकित यांनी दुसऱ्या गड्यासाठी ३५ चेंडूत ४१ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. अंकितला तनिश जैनने त्रिफळा बाद केले. त्यानंतर नौशाद शेख व साहिल औताडे(नाबाद २८धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी २३ चेंडूत २९ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी श्रेयस चव्हाण ठरला. 
    
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 
छत्रपती संभाजी किंग्ज: १९.४ षटकात सर्वबाद १०१ धावा(मुर्तझा ट्रंकवाला ३२(३६,२x४,१x६), ओम भोसले २२, आनंद ठेंगे १८, श्रेयस चव्हाण ४-२०, अक्षय दरेकर २-१२, सिद्धार्थ दरेकर २-८, निहाल तुसमद १-४, आत्मन पोरे १-२५) पराभुत वि.कोल्हापूर टस्कर्स:१४ षटकात २ बाद १०२ धावा(अंकित बावणे ३७(३३,५x४,१x६), नौशाद शेख नाबाद २८(२४,३x४), साहिल औताडे नाबाद २२(१५,१x४,२x६), केदार जाधव १५, हितेश वाळुंज १-२२, तनिश जैन १-२२); सामनावीर -श्रेयस चव्हाण; कोल्हापूर टस्कर्स संघ ८ गडी राखून विजयी.