ICC Test Ranking latest update : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (21 जून) कसोटी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले असले, तरी विराट कोहलीचेही फटका बसला आहे. फलंदाजांच्या क्रमवारी इंग्लंडच्या जो रूटने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबुशेनला मागे टाकत तो जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. रुटने 5 स्थानांनी मोठी झेप घेतली आहे असून, कसोटी क्रमवारीत तो नंबर वन फलंदाज बनला आहे.
अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर बदलले चित्र
अलीकडेच, ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या अॅशेस मालिकेत म्हणजे एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडचा दोन गडी राखून पराभव केला. यासह त्यांनी पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी क्रमवारीत बदल झाला आहे.
रूटने इंग्लंडच्या पहिल्या डावात 118 आणि दुसऱ्या डावात 46 धावा केल्या होत्या, तर लबुशेनला दोन्ही डावात फलंदाजीत छाप पाडण्यात अपयश आले. इंग्लंडविरुद्ध शून्य आणि 13 धावा करणाऱ्या लबुशेनची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने दोन स्थानांनी प्रगती करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (एका स्थानाने घसरून चौथ्या क्रमांकावर) आणि स्टीव्ह स्मिथ (चार स्थानांनी खाली जाऊन सहाव्या स्थानावर पोहोचला आहे) हे कसोटीतील नंबर वन फलंदाज बनण्याच्या शर्यतीत मागे पडले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अव्वल सहा फलंदाजांमध्ये केवळ 26 रेटिंग गुणांचा फरक आहे.
कसोटी रँकिंगमध्ये कोहली कितव्या स्थानी?
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे. एक स्थान घसरून तो 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या रॅँकिंगमध्ये 12 व्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा 25 व्या स्थानावर स्थिर आहे, तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर प्रत्येकी एक स्थानाने प्रगती करत अनुक्रमे 36 व्या आणि 37 व्या स्थानावर पोहोचले आहेत. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय फलंदाज टॉप 10 मध्ये असून तोही 10 व्या स्थानावर आहे.
गोलंदाजांमध्ये अश्विन अव्वल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला अश्विन 860 गुणांसह जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. त्याच्यानंतर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 829 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह (772) आणि रवींद्र जडेजा (765) यांनी अनुक्रमे आठवे आणि नववे स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा 825 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला (824) मागे टाकले आहे.