Ranji Trophy 2022 Final: भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या रणजी ट्रॉफीचा चषक यंदा मध्य प्रदेश संघाने बलाढ्य मुंबईला मात देत नावे केला आहे. तब्बल 41 वेळा विजेत्या मुंबईला मध्य प्रदेश संघाने अंतिम सामन्यात 6 विकेट्सने मात देत ट्रॉफी जिंकली. 


मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनल सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाला खास फलंदाजी करता न आल्याने ते 269 धावांवर सर्वबाद झाले. ज्यानंतर 108 धावांच लक्ष्य मध्य प्रदेश संघाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत पूर्ण केलं आणि चषक नावे केला आहे. 



मुंंबईच्या दमदार सुरुवातीला मध्य प्रदेशचं चोख प्रत्युत्तर


सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने प्रथम फलंदाजी घेतली. मुंबईकडून पृथ्वी आणि यशस्वी यांनी चांगली सुरुवात केली. पण 47 धावा करुन पृथ्वी बाद झाला. यशस्वीकडून चांगला खेळ सुरुच होता, पण त्याला हवी सोबत मिळत नव्हती. अखेर यशस्वीही 78 धावा करुन बाद झाला. इतर खेळाडूंना खास कामगिरी करता येत नव्हती अशात अनुभवी सरफराज खानने मात्र दमदार शतक ठोकत 134 धावा केल्या, ज्याच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 374 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. 


पण त्यानंतर प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं अफलातून फलंदाजी करत 536 धावा केल्या यावेळी एमपीच्या तीन फलंदाजांना शतकं ठोकली. यात यश दुबेने 133, शुभम शर्मा 116 आणि रजत पाटीदारने 122 धावा केल्या. सारांश जैननेही 57 धावा केल्यामुळे 536 धावांच्या मदतीने मध्य प्रदेशने 162 धावांची आघाडी घेतली.


अखेरच्या डावात मुंबईची फलंदाजी डळमळली


दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या मुंबईकरांना खास कामगिरी करता आली नाही. केवळ सुवेद पारकरने 51 धावा करत अर्धशतक केलं. तर पृथ्वीने 44 आणि सरफराजने 45 धावा केल्या इतर सर्व फलंदाज फेल झाले. मध्य प्रदेशच्या कुमार कार्तिकेयने अप्रतिम गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतले आणि 269 धावांवर मुंबईचा डाव आटोपला ज्यामुळे 108 धावांचे सोपे लक्ष्य मध्य प्रदेशला मिळालं.


4 विकेट्स गमावत मध्य प्रदेश विजयी


108 धावांचे माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या मध्य प्रदेश संघाने 4 विकेट्स गमावल्या पण रजत पाटीदारच्या नाबाद 30 धावांमुळे संघाने 29.5 षटकातचं विजय नावे केला. यावेळी शुभम शर्मानेही 30 तर हिमांशू मंत्रीने 37 धावा केल्या. ज्यामुळे मध्य प्रदेश संघाने विजय मिळवत इतिहास रचला आहे.


हे देखील वाचा-