Pakistan beats India by 191 runs in U19 Asia Cup final : पाकिस्तान अंडर-19 संघाने भारताविरुद्ध आशिया कपच्या अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर वादाला तोंड फुटले असून, पाकिस्तान संघाचे मेंटॉर सरफराज अहमद यांनी रविवारी सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) मांडणार असल्याचे जाहीर केले. भारतीय खेळाडूंचे वर्तन उचकावणारे असल्याचे त्यांनी म्हटले.

Continues below advertisement

पाकिस्तानचे दुसरे अंडर-19 आशिया कप जेतेपद

रविवारी दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 8 बाद 347 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय संघाला अवघ्या 26.2 षटकांत 156 धावांत गुंडाळत पाकिस्तानने तब्बल 191 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने तब्बल 13 वर्षांनंतर अंडर-19 आशिया कपचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या इतिहासातील हे पाकिस्तानचे दुसरे अंडर-19 आशिया कप जेतेपद ठरले.

Continues below advertisement

PCB चीफ मोहसीन नक्वी संतापले, ICC कडे करणार तक्रार?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अंडर-19 संघासाठी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात माध्यमांशी बोलताना पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर तीव्र टीका केली. हा मुद्दा आयसीसीकडे औपचारिकरीत्या मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खेळ आणि राजकारण वेगळे ठेवण्याचे आवाहनही नकवी यांनी केले. नक्वी म्हणाले की, “अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना सातत्याने उकसवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पाकिस्तान औपचारिकरित्या आयसीसीला देणार आहे. खेळ आणि राजकारण नेहमी वेगळे ठेवले पाहिजे.”

सरफराज अहमदने भारतीय संघाच्या वर्तनावर व्यक्त केली नाराजी... 

यापूर्वी याच मीडिया संवादात संघाचे मेंटॉर सरफराज अहमद यांनीही भारतीय संघाच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी भारताचे वर्तन अनैतिक असल्याचे सांगत क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असल्याचा आरोप केला. सरफराज म्हणाला की, “सामन्यादरम्यान भारतीय संघाचे वर्तन योग्य नव्हते. ते क्रिकेटच्या विरोधात होते. तरीही आम्ही आमचा विजय खेळभावनेने साजरा केला. क्रिकेट नेहमी योग्य भावनेने खेळले गेले पाहिजे. भारताने जे केले, ते त्यांच्या स्वतःच्या आचरणाचे दर्शन घडवते.” या प्रकरणामुळे भारत-पाकिस्तान अंडर-19 क्रिकेटमधील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाचा -

मुंबईच्या संघात पुन्हा बदल; टी-20 विश्वचषकासाठी निवड झालेल्या दोन खेळाडूंची अचानक एन्ट्री, रोहित फक्त दोन सामने खेळणार?