IND vs NED : बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्यात विश्वचषकातील अखेरचा सामना सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 410 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल नेदरलँड्स संघाची सुरुवात ठिकठाक झाली. सिराजने नेदरलँड्सला सुरुवातीलाच झटका दिला. त्यानंतर कोलिन एकरमन याने मोर्चा संभाळला. त्याला कुलदीपने माघारी झाडले. नेदरलँड्सच्या ओडियड (O'Dowd) याचा झेल सिराजकडून सुटला. पण झेल घेण्याच्या प्रयत्नात मोहम्मद सिराजला दुखापत झाली. कुलदीप यादवच्या चेंडूवर ओडियड याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत होता, सिराज चेंडूच्या खाली आला... झेल घेण्यासाठी सिराजने हात उंचावले. पण चेंडू त्याच्या हातातून सुटला तो थेट गळ्यावर लागला. 


चेंडूचा वेग जास्त असल्यामुळे सिराजच्या गळ्यावर जोरदार मार लागलेला असू शकतो, असा  अंदाज वर्तवला जातोय. सिराज सध्या मैदानाच्या बाहेर गेलाय. त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरु आहेत. त्याला थुंकी गिळतानाही त्रास होत असल्याचे समजतेय. सिराजची दुखापत गंभीर असल्यास भारताला मोठा धक्का बसू शकतो. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरोधात भिडणार आहे. या सामन्याआधी सिराजची दुखापत गंभीर असेल तर भारातला मोठा धक्का मानला जातोय. बुमराह, सिराज आणि शामी यांनी वेगवान माऱ्याची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. मोहम्मद सिराजने दुखापतीमुळे मैदान सोडल्यानंतर विराट कोहलीने गोलंदाजीचा मोर्चा संभाळला आहे. याआधीही हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर विराट कोहलीने गोलंदाजी केली होती. 










इम्रान ताहीरलाही गळ्याला लागला होता चेंडू, तो नेमकं काय म्हणाला ?


सिराजच्या गळ्याला चेंडू लागल्यानंतर समालोचन करणाऱ्या इम्रान ताहीर याने स्वत:चा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, माझ्याही गळ्यावर एकदा चेंडू लागला होता. प्रचंड वेदना झाल्या होत्या. थुंकीही गिळता येत नव्हती. त्याशिवाय श्वास घेण्यास त्रास झाला होता. अशाप्रकारच्या दुखापतीमधून सावरण्यासाठी मला चार ते पाच तासांचा कालावधी लागला होता. पण सिराजवर लवकरात लवकर उपचार करावेत. जेणेकरुन तो मैदानावर लगेच परतेल. सेमीफायनलसाठी सिराजची उपस्थिती टीम इंडियाला गरजेची आहे.







भारताचा 410 धावांचा डोंगर - 
भारतीय फलंदाजांनी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज फटक्यांची जणू दिवाळी साजरी केली. त्यामुळंच नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या विश्वचषक साखळी सामन्यात भारताला चार बाद 410 धावांचा डोंगर उभारता आला. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलनं झंझावाती शतकं साजरी केली. श्रेयस अय्यरनं 94 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 128 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं 64 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांसह 102 धावांची खेळी केली. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात नेदरलँड्सच्या दुबळ्या आक्रमणाचा पुरेपूर लाभ उठवला आणि धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. भारताच्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांनी या सामन्यात अर्धशतकं झळाकवली. रोहित शर्मानं 61, शुभमन गिलनं 51 आणि विराट कोहलीनं 51 धावांची खेळी केली.