MLC 2025: आयपीएल किंवा इतर टी 20 क्रिकेट लीगमध्ये असं अनेकदा पाहायला मिळतं की एखाद्या क्रिकेटपटूला रिटायर्ड आऊट केलं जातं. त्या फलंदाजाच्या जागेवर दुसऱ्या फलंदाजाला मैदानात पाठवलं जातं. अनेकदा संघाचा कॅप्टन हा निर्णय घेतो कारण मैदानावर असलेला फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करत असेल. संघाच्या व्यवस्थापनाचा आणि कॅप्टनचा हा विचार असतो की त्या फलंदाजाच्या जागेवर दुसरा फलंदाज पाठवायचा ज्यामुळं वेगानं धावा केल्या जातील. असाच एक प्रसंग अमेरिकेतली मेजर लीग क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. इथं मात्र भलतंच घडलं. एका शतक केलेल्या फलंदाजाला रिटायर्ड आऊट करण्यात आलं. त्याच्या जागी दुसऱ्या फलंदाजाला मैदानावर पाठवण्यात आलं. मात्र, यानंतर जे घडलं त्यामुळं त्या संघाच्या मॅनेजमेंटवर तोंड लपवण्याची वेळ आली.
शतकवीर आंद्रे फ्लेचरला माघारी बोलावलं
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात शुक्रवारी मॅच सुरु होती. या मॅचमध्ये नाईट रायडर्सचा सलामीवर फलंदाज आंद्रे फ्लेचर यानं शतक केलं. फ्लेचरनं 18 ओव्हर संपेपर्यंत 60 बॉलमध्ये 104 धावा केल्या होत्या. यानंतर संघानं त्याला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी आक्रमक फलंदाज रोवमन पॉवेलला पाठवलं.
नाईट रायडर्सचा प्लॅन फसला
फ्लेचरला रिटायर्ड आऊट करण्याचा टीमचा निर्णय फसल्याचं पाहायला मिळालं. रोवमॅन पॉवेलला मैदानावर पाठवण्यात आलं. पॉवेल 19 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला. नाईट रायडर्सचा हा प्लॅन फसला.
फ्लेचरचं शतक व्यर्थ
आंद्रे फ्लेचरनं 60 बॉलमध्ये शतक करुन देखील तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. फ्लेचरच्या फलंदाजीमुळं नाईट रायडर्सनं वॉशिंग्टन फ्रीडमसमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वॉशिंग्टन फ्रीडनं अखेरच्या बॉलवर विजय मिळवला. वॉशिंग्टनकडून मिचेल ओवन 43, ग्लेन मॅक्सवेल 42 आणि ग्लेन फिलिप्स 33 धावा केल्या.