Match Fixing Indian Cricket Four Assam Players Suspended : भारतीय क्रिकेटवर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचे सावट पसरले पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख देशांतर्गत स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 दरम्यान मॅच फिक्सिंग करण्याच्या प्रयत्नांप्रकरणी असम क्रिकेट संघटनेने (ACA) आपल्या चार खेळाडूंना तात्काळ निलंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चार खेळाडूंवर असमच्या सध्याच्या संघातील सदस्यांना भ्रष्ट कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे. हे कथित प्रकरण 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत असम संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया हेही असम क्रिकेटशी संबंधित आहेत.

Continues below advertisement

या 4 खेळाडूंवर कारवाई

असम क्रिकेट संघटनेने शुक्रवार 12 डिसेंबर रोजी एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत हा धक्कादायक खुलासा केला. त्यानुसार अमित सिन्हा, इशान अहमद ,अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी या चारही खेळाडूंना निलंबित करण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या स्तरांवर असमसाठी क्रिकेट खेळलेले आहेत.

Continues below advertisement

असम क्रिकेट संघटनेने केली FIR दाखल

या प्रकरणी असम क्रिकेट संघटनेने क्राइम ब्रँचकडे FIR दाखल केली आहे. संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, “तक्रारी समोर आल्यानंतर बीसीसीआयच्या अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिटने (ACSU) तपास सुरू केला. ACAनेही स्वतंत्र फौजदारी चौकशी हाती घेतली. प्राथमिक तपासात या खेळाडूंचा गंभीर आरोपांमध्ये सहभाग आढळून आला असून, यामुळे खेळाच्या पवित्रतेला तडा गेला आहे. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

ACAने या चौघांवर संपूर्ण राज्यात कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे. चौकशी पूर्ण होऊन निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत हे खेळाडू कोणत्याही स्तरावरील स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. याबाबत राज्यातील सर्व जिल्हा क्रिकेट संघटनांना कळवण्यात आले आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की हे खेळाडू कोणत्याही सामन्यावर किंवा खेळाडूवर प्रत्यक्ष परिणाम घडवण्यात यशस्वी झाले होते की नाही.

रणजी ट्रॉफी खेळणारा खेळाडूही संशयाच्या भोवऱ्यात

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक नाव म्हणजे अभिषेक ठाकुरी. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरू होण्याच्या काही दिवस आधीच तो रणजी ट्रॉफीत असमकडून खेळत होता. त्याने सर्व्हिसेस आणि त्रिपुरा विरुद्धच्या सामन्यांमध्ये भाग घेतला होता. या मालिकेत त्याच्या तीन डावांमध्ये अनुक्रमे 9, 20 आणि 20 धावा झाल्या होत्या. मात्र, या रणजी सामन्यांतील त्याची कामगिरीही तपासाच्या कक्षेत आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मागील हंगामातही ठाकुरीने विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला होता. तर अमित सिन्हा 2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सामने खेळला होता.

हे ही वाचा -

T20 World Cup : आगामी टी 20 वर्ल्डकपचं प्रक्षेपण कोण करणार? आयसीसी आणि जिओस्टारनं उत्तर दिलं, उलट सुलट चर्चांना ब्रेक