Manoj Tiwary no Gautam Gambhir : भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपासून ते सध्याच्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरपर्यंत अनेकांवर थेट टीका केली आहे. तिवारीने सांगितले की, धोनीने कर्णधार असताना कधीही त्याला साथ दिली नाही. आता त्याने गंभीरला सरळ ‘पाखंडी’ म्हटले आहे.

तिवारी आणि गंभीर यांचे संबंध पूर्वीपासूनच फारसे चांगले नाहीत. दिल्लीमध्ये झालेल्या रणजी सामन्यात दोघांमध्ये शिवीगाळ झाली होती, हे प्रकरण सर्वांना माहित आहे. आता भारत–पाक सामना डोळ्यासमोर ठेवून तिवारीने गंभीरवर निशाणा साधला आहे.

गंभीरचे जुने विधान विरुद्ध आताचा वास्तव

'क्रिक ट्रॅकर’ला दिलेल्या मुलाखतीत तिवारीने गंभीरच्या जुन्या मुलाखतीची आठवण करून दिली. त्यावेळी गंभीरने स्पष्टपणे म्हटले होते की, ‘जोपर्यंत सीमापार दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये.’ पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतरही गंभीरने अशीच भूमिका मांडली होती.

पण आता चित्र उलट आहे. आशिया कप 2025 मध्ये भारत–पाक यांच्यात एक नाही तर तब्बल तीनदा सामना होण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबरला लीग सामन्यात, त्यानंतर सुपर-4 मध्ये आणि जर दोन्ही संघ फायनलला पोहोचले तर तिसऱ्यांदा भिडंती होणार आहे.

मनोज तिवारीने गौतम गंभीरला सुनावले

त्यामुळे मनोज तिवारीने गौतम गंभीरला सुनावले आणि म्हणाला की,  "मी कायमच गौतम गंभीरला पाखंडी मानत आलो आहे. कारण कोच होण्यापूर्वी तो म्हणायचा की भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. आता काय करणार? तोच आता त्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे, जो पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. जर खरोखरच त्याला आपल्या शब्दांवर ठाम राहायचे असेल, तर गंभीरने राजीनामा द्यायला हवा आणि सांगायला हवे की तो पाकिस्तानविरुद्ध खेळणाऱ्या संघाचा भाग होणार नाही."

 सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

आशिया कप 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईशी आहे, ज्यासाठी आता फक्त 2 आठवडे शिल्लक आहेत. त्यानंतर टीम इंडिया 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघाने निवडलेल्या संघात सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच्यासोबत शुभमन गिलची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा -

Team India Title Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार 65 हजार कोटींच्या कंपनीचं नाव? आशिया कपच्या तोंडावर BCCI घेणार मोठा निर्णय