बर्मिंगहॅम : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातील टीम इंडियाचा अखेरचा सामना हा महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलाही अखेरचा सामना असण्याची शक्यता आहे. विश्वचषकानंतर धोनी भारताकडून पुन्हा खेळेल असं वाटत नसल्याचं मत बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना व्यक्त केलं आहे.


भारताच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा अचानक राजीनामा देऊन धोनीने धक्का दिला होता. त्यामुळे त्याचा काहीच भरवसा देता येत नाही, याकडे या पदाधिकाऱ्याने लक्ष वेधलं. टीम इंडियाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि 14 जुलैला लॉर्डसवर विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला, तर भारतीय संघाने धोनीच्या कारकीर्दीला उचित सन्मानाने दिलेला निरोप ठरेल, असंही या पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे.

सध्याच्या निवड समितीचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण वार्षिक सभेपर्यंत आहे. त्यानंतर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी ट्वेण्टी20 विश्वचषकासाठी संघ निवडची प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत नव्या निवड समितीसाठी टी20 विश्वचषकासाठी फार अवधी शिल्लक राहणार नाही.

बॅटिंग आणि विकेटकीपिंगप्रमाणे निवृत्त कधी व्हायचं हेसुद्धा मला कळतं - एमएस धोनी

खुलेपणाने बोलण्यास संघ व्यवस्थापन, बीसीसीआयचा नकार
टीम इंडियाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असला तरी संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआय या संवेदनशील मुद्द्यावर खुलेपणाने कोणतंही भाष्य करत नाही. धोनीने सध्याच्या विश्वचषकातील सात सामन्यात 223 धावा केल्या आहे. परंतु तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. तर नेटकऱ्यांनी त्याच्या फिनिशरच्या कौशल्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सचिन-सौरवचेही प्रश्न
या विश्वचषकात धीमी फलंदाजी आणि धोनीच्या दृष्टीकोनावर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनेही प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला माहित आहे की, या विश्वचषकानंतर धोनीला संघात ठेवण्याची जोखीम घेता येणार नाही.

विश्वचषकानंतर गोष्टी पहिल्यासारख्या राहणार नाहीत
संघ व्यवस्थापनाने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानच स्पष्ट केलं होतं की, 2019 च्या विश्वचषकापर्यंत धोनी संघात हवा आहे. आता भारतीय संघ उपांत्य फेरी पोहोचल्याने त्याच्या सरासरी कामगिरीचा आपोआपच बचाव झाला आहे. त्यामुळे धोनीला कोणी निवृत्ती घेण्याबाबत सांगणार नाही. पण विश्वचषकानंतर गोष्टी आताएवढ्या सोप्या राहणार नाहीत, असं मत भारतीय संघाच्या एका माजी क्रिकेटपटूने व्यक्त केलं.

धोनीची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी
दक्षिण आफ्रिका - 34 धावा (46 चेंडू)
ऑस्ट्रेलिया - 27 धावा (14 चेंडू)
पाकिस्तान - 1 धाव (2 चेंडू)
अफगाणिस्तान - 28 धावा (52 चेंडू)
वेस्ट इंडीज - नाबाद 56 धावा (61 चेंडू)
इंग्लंड - नाबाद 46 धावा (31 चेंडू)
बांगलादेश - 35 धावा (33 चेंडू)

खेळ माझा : कॅप्टन कूल धोनी खरंच रिटायर होतोय?