Ramakant Achrekar Sir Statue मुंबई: दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (पार्क) सर रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांचे स्मृतिशिल्प उभारले जाणार आहे. राज्य सरकारकडून स्मृतीशिल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शिवाजी पार्क परिसरातील गेट क्र. 5 जवळ रमाकांत आचरेकरांचे (Ramakant Achrekar) स्मृतिशिल्प उभारले जाणार आहे. रमाकांत आचरेकर यांचे स्मृतिशिल्प गेट क्र. 5 जवळील मोकळ्या जागेतील सहा फुटांच्या लांबी, रुंदी आणि उंचीचे असणार आहे. आवश्यक परवानग्या, वेळेत स्मृतीशिल्प उभारले जाईल यासंदर्भात मुंबई पालिकेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृतिशिल्प उभारणीनंतर देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी आणि लागणारा निधीची तरतुदीची जबाबदारी बी.व्ही. कामथ मेमोरीअल क्रिकेट क्लबची राहणार आहे.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
आचरेकर सरांचा माझ्या जीवनावर आणि इतर अनेक जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत आहे. त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले. शिवाजी पार्कवर कायम राहणे हीच आचरेकर सरांची इच्छा असेल. आचरेकर सरांचा त्यांच्या कर्मभूमीवर पुतळा उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला, अशा भावना सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या.
सर आचरेकरांनी जागतिक कीर्तीचे खेळाडू घडविले-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडविण्यात आचरेकर सरांचे मोठे योगदान आहे. जागतिक कीर्तीचे अनेक खेळाडू त्यांनी घडविले. मुंबईला क्रिकेटची पंढरी समजली जाते. तर शिवाजी पार्क हे खेळाडूंसाठी चंद्रभागाप्रमाणे आहे. या मैदानात आचरेकर सरांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. क्रिकेट म्हटले की आचरेकर सरांचे नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांची स्मृती चिरंतन राहण्यासाठी शिवाजी पार्कवर त्यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती.
आचरेकर सरांचं योगदान महत्त्वाचं -
सचिनच्या जडणघडणीत आचरेकर सरांचं योगदान महत्त्वाचं आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दित अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये सचिनचा उल्लेख केला जातो. क्रिकेटमधील या योगदानाबद्दल भारत सरकारने सचिनला देशातील 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.