Lucknow Super Giants Update : आयपीएलमधील नवीन संघ लखनौ सुपर जायंट्स संघाने सोमवारी संघाचा लोगो रिलीज केला आहे. संघाचा लोगो तयार करताना तिरंग्याच्या रंगांशी साधर्म्य साधलं आहे. पक्षाच्या आकाराचा लोगो तयार करण्यात आलाय. लोगोच्या मध्यभागी बॅट आहे. बॅटच्या मध्यभागी लाल रंगाचा चेंडूही लावण्यात आलाय. संघाचं नाव निळ्या रंगात लिहिण्यात आलेय. लखनौ संघाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर व्हिडीओ पोस्ट करत लोगोबाबतची माहिती दिली.
प्राचीन भारताच्या पौराणिक कथनकांच्या आधारावर लखनौ संघाचा लोगो तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. लखनौ संघाच्या लोगोमधील पक्षी गरुडाप्रमाणे आहे. हा लोगो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लखनौ संघाचा लोगो पुणे संघाच्या लोगोसारखा असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटलेय. यावरुन सोशल मीडियात चर्चा सुरु आहे.
यंदा आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा सहभाग झाला आहे. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये दहा संघ असणार आहेत. लखनौ संघाचं कर्णधारपद राहुलकडे सोपवण्यात आलं आहे. लखनौ संघाची मालकी आरपी संजीव गोयंका ग्रुपकडे आहे. 24 जानेवारी रोजी लखनौ संघाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. संजीव गोयंका यांच्या या नव्या संघाचं नाव लखनऊ सुपर जायंट्स असे आहे. लखनऊ फ्रेंचायझीने चाहत्यांना आपल्या संघाचं नाव सुचवण्याची विनंती केली होती. दरम्यान, 2017 मध्ये आरपी गोयंका ग्रुपने पुण्याचा संघ विकत घेतला होता. या संघाचे नाव रायझिंग पुणे सुपरजायंट्स ठेवण्यात आले होते. याच नावाशी मिळतं जुळतं नाव लखनौ संघाचं ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आयपीएल लिलावाआधी लखनौ संघाने के. एल. राहुल, स्टॉयनिस आणि रवि बिश्नोई या तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. लखनौ संघाने राहुलला कर्णधारही केलं आहे. राहुलसाठी लखनौ संघाने 17 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू स्टॉयनिससाठी 9.2 कोटी रुपये मोजले आहेत. अनकॅप भारतीय रवि बिश्नोईला 4 कोटी रुपयात संघात ठेवलं आहे. तीन खेळाडूंसाठी लखनौ संघाने 30.2 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे लखनौ संघाकडे 59.8 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ लखनौ ठरला आहे. संजीव गोएंका ग्रुपने तब्बल 7 हजार 90 कोटींना संघ विकत घेतला. आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार असणारा गौतम गंभीर मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत जोडला गेला आहे. तसेच झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची (Andy Flower) लखनौचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.