JP Duminy South Africa : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी धडपडत आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. दरम्यान, संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा वनडे फॉरमॅटचा फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्युमिनीने राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जेपी ड्युमिनी काही काळ संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत होता, मात्र त्याने वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने जेपी ड्युमिनीच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, "जेपी ड्युमिनीने वैयक्तिक कारणास्तव व्हाईट-बॉल फलंदाजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे."
जेपी ड्युमिनीची 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मार्च 2023 मध्ये त्याचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला होता. ड्युमिनीच्या देखरेखीखाली दक्षिण आफ्रिकेने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली आणि उपांत्य फेरी गाठली. 2024 टी-20 वर्ल्ड कपदरम्यान ड्युमिनी दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत नव्हता, कारण त्यावेळी त्याने कौटुंबिक कारणांमुळे संघ सोडला होता. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आपल्या नव्या फलंदाजी प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या संघाला लवकरच नवा फलंदाजी प्रशिक्षक मिळू शकतो.
नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू
जेपी ड्युमिनीच्या राजीनाम्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला (T20 आणि ODI) नवीन फलंदाजी प्रशिक्षकाची गरज आहे. देशाच्या क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन फलंदाजी प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला असून लवकरच नवीन नावाची घोषणा केली जाईल.
जेपी ड्युमिनीने 2004 ते 2019 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, त्याने प्रोटीज संघासाठी 46 कसोटी सामने, 199 एकदिवसीय सामने तसेच 81 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो बराच काळ संघाचा फिनिशर होता. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने आफ्रिकेसाठी 326 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9,000 हून अधिक धावा केल्या आणि 132 बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. आफ्रिकेने पहिला सामना 233 धावांनी जिंकला आहे. दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा श्रीलंकेने 3 गड्यांच्या मोबदल्यात 242 धावा केल्या आहेत. मात्र पहिल्या डावात तो अजूनही 116 धावांनी मागे आहे.