Mark Taylor On Joe Root : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एक दिग्गज माजी फलंदाज मार्क टेलर यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट (Joe Root) महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin tendulkar) सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड तोडू शकतो असा दावा केला आहे. नुकतच रुटने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात नाबाद शतक ठोकत न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडला विजय मिळवून दिला. ज्यानंतर त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इंग्लंड संघासाठी एक महत्त्वाचा विजय जो रुटच्या नाबाद शतकाने मिळवून दिला. दरम्यान या खेळीच्या जोरावर जो रूटने 10,000 धावांचा आकडाही पार केला. टेस्टमध्.े अशी कामगिरी करणारा तो 14 वा फलंदाज असून त्याच्या नावावर 10,015 धावा आहेत. सध्या तो तेंडुलकरपासून 5 हजार 906 धावांनी मागे आहे. सचिनने 200 टेस्ट सामन्यात 15 हजार 921 रन केले होते. मार्क टेलरच्या मते जो रुट सध्या 31 वर्षांचा असून त्याच्याकडे आणखी बरीच वर्षे आहेत ज्यात तो क्रिकेट खेळून सचिनचा रेकॉर्ड तोडू शकतो. स्काय स्पोर्ट्सवर बोलताना टेलर म्हणाला, "जो रूट कमीत कमी आणखी पाच वर्षे क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे माझ्या मते तो तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड तोडू शकतो. रूट फलंदाजी ही चांगली करतो त्यामुळे तो 15 हजार धावा नक्कीच करु शकतो.''
जो रूटची दमदार खेळी
लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. एकेकाळी न्यूझीलंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेईल, असं वाटत असताना जो रूटनं संघाचा डाव सावरत इंग्लंडला विजय मिळवून दिला. रूटशिवाय कर्णधार बेन स्टोक्सनंही अर्धशतक झळकावलं. तर बेन फोक्सनं रुटसोबत चांगली भागीदारी करत संघासाठी 32 धावांचं योगदान दिलं.
जो रूटच्या नावावर खास विक्रम
इंग्लंडसाठी सर्वात जलद 9,000 धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. आता 10 हजार धावांचा आकडा गाठत त्यानं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात जो रूटनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 26 वं शतक पूर्ण केलं. इंग्लंडसाठी 10,000 हजार धावांचा आकडा पार करणारा तो दुसरा फलंदाज आहे. रुटनं आपल्या 118व्या कसोटीत ही कामगिरी केली. तर, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील 14वा फलंदाज आहे. याआधी अॅलेस्टर कूकनं इंग्लंडसाठी 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता.
हे देखील वाचा-