Jaydev Unadkat joins Sussex : देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर नाव कमावणारा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने पुन्हा एकदा इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. उनाडकट सलग दुसऱ्या हंगामात ससेक्सकडून खेळताना दिसणार आहे आणि शेवटच्या पाच सामन्यांसाठी तो क्लबचा भाग असेल. या क्लबमध्ये चेतेश्वर पुजाराचाही समावेश आहे, जो उनाडकटसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्रकडून खेळतो.


पाच सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 32 वर्षीय वेगवान गोलंदाजाची निवड केलेली नाही. चार संघांसाठी निवडलेल्या 50 हून अधिक खेळाडूंमध्ये उनाडकटलाही स्थान देण्यात आले नाही. अशा परिस्थितीत त्याने इंग्लंडला जाऊन कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.


ससेक्समध्ये सामील झाल्यावर जयदेव उनाडकट दिली प्रतिक्रिया


ससेक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये जयदेव उनाडकटने परत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "येथे परत आल्याने मला खरोखर आनंद होत आहे. हॉव्ह हे माझे दुसरे घर आहे. या हंगामात संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि आशा आहे की आम्ही हंगामाच्या उत्तरार्धात चांगली कामगिरी करू आणि डिव्हिजन 1 मध्ये परत येऊ."


जयदेव उनाडकटने गेल्या काऊंटी हंगामात ससेक्सकडून तीन सामने खेळले आहे. या काळात त्याने पाच डावात 86 षटके टाकली आणि 11 बळी घेतले. एका डावात 94 धावांत 6 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. ससेक्सला आशा आहे की या हंगामातही उनाडकट आपला संघासाठी चांगली कामगिरी सुरू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.


जयदेव उनाडकटच्या कारकिर्दीवर एक नजर


वेगवान गोलंदाज उनाडकटने अगदी लहान वयात भारताकडून कसोटी पदार्पण केले. पण त्यानंतर त्याला बरीच वर्षे बाहेर राहावे लागले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत कठोर परिश्रम केले आणि नंतर भारतीय संघात पुनरागमन करण्यात यश मिळवले. उनाडकटने भारतासाठी 4 कसोटी, 8 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर तिन्ही फॉरमॅटसह एकूण 26 विकेट आहेत. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 114 सामन्यात 403 बळी घेतले आहेत.



संबंधित बातमी :


IPLच्या स्टारचा झाला मोठा अपघात! मानेला चेंडू लागल्याने गंभीर जखमी; हॉस्पिटलमध्ये दाखल


सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस


ऑलिम्पिकआधी मोडकळीस आलेले घर अन् 80 लाखांची संपत्ती; सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता अर्शद नदीमने नीरज चोप्रालाही टाकलं मागे!